सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चारमध्ये असलेल्या सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीमध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर चार परिसरात महापालिकेची सारसोळे शांतीधाम स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेरूळ पूर्व परिसर, जुईनगर नोड, सारसोळे गाव, कुकशेत गाव, सेक्टर ६,८,१०,१२,१६ए,१८,१८ए, २४, २८ या भागातून मृतदेह येत असतात. बुधवार, दि. २४ जुलै रोजी या स्मशानभूमी जुईनगर व नेरूळ पूर्व भागातून मृतदेह अंत्यविधीसाठी आले होते, मृताचे नातेवाईक म्हणून नेरूळ पूर्वमधून सलग चार वेळा निवडून आलेले संतोष शेट्टी हे माजी ज्येष्ठ नगरसेवकही अंत्यविधीसाठी उपस्थित होते. या स्मशानभूमीत अंर्तगत भाग संपूर्णपणे शेवाळलेला आहे. मृतासोबत आलेले अनेकजण या ठिकाणी घसरुन पडले आहेत. याशिवाय मृतदेहाला खांदा देणारेदेखील बुधवारी मृतदेहासोबत पडले असते. पटकन काहींनी त्यांना सावरल्याने मृतदेहाची तिरडी पकडल्याने संभाव्य दुर्घटना टळली. स्मशानभूमीचा अंर्तगत भाग पूर्णपणे शेवाळल्याने निसरडा झाला आहे. अंत्यविधीसाठी येणारे घसरुन पडत आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता तातडीने सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत ब्लिचिंग पावडरची फवारणी तातडीने करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



