सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची धुरा काही दिवसांपूर्वीच डॉ. कैलास गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आली. कैलास गायकवाडांसारखा खमक्या अधिकारी अतिक्रमण विभागाच्या प्रमुखपदी येताच काही तरी वेगळे घडेल, असा आशावाद व्यक्त केला जात होता. तथापि त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीसमोरच आरोग्य विभागाच्या होर्डींग कमानीवर अनधिकृत होर्डींग व बॅनरचे अतिक्रमण होत असतानाही नेरूळ विभाग कार्यालय कारवाईस टाळाटाळ करत असल्याने गायकवाडांच्या नजरेसमोरच खुलेआमपणे नेरूळ पश्चिमेला बकालपणाचा विळखा बसल्याचे पहावयास मिळत आहे.
नेरूळ पश्चिमेला अनधिकृत बॅनर, होर्डींगचा बाराही महिने अंर्तगत भागात, बाह्य भागात, चौक, पथदिवे, सार्वजनिक जागा. नेरुळ रेल्वे स्टेशनचा परिसर, रामलीला मैदान, सारसोळे डेपो चौक, समाधान चौक , साईबाबा हॉटेल चौक, एल मार्केट परिसर, झुलेलाल मंदिर ते सेक्टर २४ मधील बामनदेव झोटींगदेव क्रिडांगणापर्यतच रोड, स्टेशन रोड, बांचोली मैदान, राजीव गांधी उड्डाणपुल, पामबीच मार्गावरील सारसोळे जेटी जंक्शन या ठिकाणी विळखा बसलेला आहे. विशेष म्हणजे अतिक्रमण उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड नेरूळ पश्चिमेला राहत असतानाही पालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग कारवाई करण्यास, बकालपणा हटविण्यास टाळाटाळ करण्याचे धाडस दाखवित असल्याची उलटसूलट चर्चा नेरूळवासियांमध्ये सुरु झालेली आहे. सेक्टर सहामधील नेरुळ सिवह्यू उद्यानातील आरोग्य विभागाच्या जनजागृतीपर कमानीसाठी आरक्षित असलेल्या कमानीवरही दररोज अनधिकृतरित्या बॅनर लागत असतानाही कैलास गायकवाड नेमके करतात तरी काय? अशी विचारणा नेरूळवासियांकडून खुलेआमपणे केली जात आहे.
बॅनर व होर्डींगपुरताच नाही तर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचाही विळखा नेरूळ पश्चिमेला पडला असून पदपथ नागरिकांना चालण्यासाठी शिल्लक राहीलेले नाही. अतिक्रमण उपायुक्त गायकवाड यांचे निवासी वास्तव्य असलेल्या इमारतीसमोरच टायरवाला, झामा, हॉटेल लाईन, टेम्पटेशन, मसाला सेंटर यांचे मार्जिनल स्पेसवर अतिक्रमण, त्या ठिकाणी होणारी वाहतुक कोंडी, महापालिकेच्या नो पार्किंग फलकाशेजारीच वाहनांची पार्कींग, नेरूळ पश्चिमेकडील उद्याने, समाजमंदीर, व्यायामशाळा, चौक येथील पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नसल्याने फेरीवाल्यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अभय असल्याने अर्थकारणाचा नेरूळमधील रहिवाशांकडून खुलेआमपणे संशय व्यक्त केला जात आहे.
अतिक्रमण उपायुक्त गायकवाड यांच्या बिल्डींगसमोरील रस्त्यावरच फालुदावाले गाडी घेऊन व्यवसाय रात्री उशिरापर्यत करतात. नेरूळ सिव्ह्यू उद्यानालगत फेरीवाल्यांचा विळखा सकाळपासून असतो. विशेष म्हणजे हे उद्यान उपायुक्त गायकवाड यांच्या निवासस्थानाच्या बिल्डींगसमोरच आहे. नेरूळ पश्चिमेला अनधिकृत होर्डीग व फेरीवाल्यांचा सुळसुळाट झालेला असताना व अतिक्रमण उपायुक्तांचे निवासस्थानही नेरूळ पश्चिमला असतानाच अतिक्रमण विभाग याकडे बघ्याची भूमिका घेत आहे, अनधिकृत बॅनर, होर्डींगमुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. बकालपणा येत आहे. असे असतानाही अतिक्रमण विभाग उदासिनता दाखवित असल्याने नेरूळवासियांकडून संताप व्यक्त केला जात आहे.



