सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ मोहीमेंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अनुषंगाने बुधवार, दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर रबाळे येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा शाळा क्र. ५५ येथे तिरंगा रॅलीचे भव्यतम आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी विशेष मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री गणेश नाईकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मंत्री नाईक तसेच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीचे महत्व सांगितले.
तिरंगा रॅली प्रसंगी माजी महापौर सुधाकर सोनवणे, शिक्षण उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, परिमंडळ २, उपआयुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त उत्तम खरात, स्वच्छता अधिकारी विजय पडघन, तसेच शाळेचे मुख्याध्यापक अमोल खरसंबळे व श्रीमती स्नेहल विशे, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
अशाच प्रकारे सीबीडी बेलापूर येथील महापालिका मुख्यालय परिसरातही तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेलापूरगाव येथील नमुंमपा शाळा क्र.०१ चे विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व शिक्षण अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे आणि स्वच्छता अधिकारी व निरीक्षक उपस्थित होते. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयात प्रदर्शित केलेल्या तिरंगा प्रदर्शनाला भेट देऊन तिरंगा ध्वजाचा प्रवास जाणून घेतला.
तिरंगा रॅलीमध्ये ‘घरोघरी तिरंगा – घरोघरी स्वच्छता’ अशा विविध घोषणा देत व विविध घोषणांचे फलक उंचावत, तिरंगी झेंडे फडकवत विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीचा प्रसार केला.



