आरक्षण असावे की नसावे हा स्वतंत्र विषय आहे. सध्या मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. मुळातच मराठे आरक्षण मागत असतील तर ते त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. मराठा आरक्षण हा विषय मराठा, राज्य सरकार, न्यायालय व केंद्र सरकार यांच्या अखत्यारीतील बाब आहे. आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाजाची आजवर न भरुन येणारी हानी झाली आहे. मराठा आरक्षणासाठी संघठीत झाला असताना अन्य समाजाने त्याविरोधात उभे राहणे, सोशल मीडियावर मराठा समाजाच्या लढ्याबाबत कुचेष्टेने बोलणे, हा सर्व प्रकारच अनाकलनीय आहे. मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण न मिळाल्याने ८० ते ९० टक्के मिळूनही अपेक्षित ठिकाणी हव्या असलेल्या शिक्षणाच्या संधी आजवर उपलब्ध झाल्या नाहीत. त्याच ठिकाणी ४० ते ६५ टक्के गुण मिळालेल्यांना सहजासहजी अॅडमिशन मिळते. ही शैक्षणिक विषमता खरोखरीच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होती का? यावरही आज विचारमंथन होणे आवश्यक आहे. अनेकदा प्रवेश मिळाला तरी अवाढव्य असणाऱ्या शैक्षणिक शुल्कामुळे एकतर मराठा समाजाच्या परिवारांना मुलांना शिकविण्याची इच्छा असतानाही माघार घ्यावी लागत होती.
अथवा शेती विकून, गहाण ठेवून मुलांची फी भरण्याची वेळ मराठा समाजावर आलेली आहे. एकतर कमी गुण असलेल्यांना अॅडमिशन व फी भरताना इतरांना सवलत आणि मराठा समाजावर भुर्दंड यामुळे मराठा समाज आजवर भरडला गेला होता. मराठा समाज सधन असल्याचे चित्र जाणिवपूर्वक रंगविण्यात येत आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षणापासून जाणिवपूर्वक चार हात लांब ठेवण्याचे हे षडयंत्र आहे. जेमतेम पाच ते दहा टक्के मराठा समाज सधन आहे. परंतु हा समाज म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही. आजही ८० ते ८५ टक्के मराठा समाज विशेषत: नोकरदार तसेच शेतकरी वर्ग आजही परिस्थितीशी संघर्ष करत आहे. यात बदल व्हावा, मराठा समाजातील हुशार मुलांना कमी खर्चात शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी आरक्षण उपयुक्त ठरणार आहे. जरांगेपाटील यांनी मराठा समाज संघठीत केला आहे. कधी नव्हे तो मराठा समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. कालपरवाच्या मुंबईतील आंदोलनात मराठा समाजाला अन्नपाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरुवातीचे दीडदोन दिवस केल्यामुळे महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागातील मराठा समाज संघठीत झाला. जीआर निघाला आहे. अंमलबजावणी नक्कीच होईल. कोणी असंतुष्ट घटक न्यायालयात जातील. पण मागचे जीर व आताचा जीआर यात फरक आहे. त्यामुळे या जीआरची नक्कीच अंमलबजावणी होईल. आम्हाला शिक्षण हवे, गुणवत्ता असूनही शिक्षण मिळत नाही. मिळालाच प्रवेश इतरांच्या तुलनेत मराठा समाजाला महागडे शिक्षण. हा काय प्रकार आहे? मराठा समाज हा महाराष्ट्रातलाच घटक आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना शिवछत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून मराठा समाज लढला आहे. आज स्वातंत्र्यानंतर ८० व्या वर्षांत पर्दापण करतानाही मराठा समाजाला हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे. मंत्रालय मुंबईत असल्याने न्यायासाठी मराठा समाजाला मुंबईतच यावे लागणार. यावेळी मराठा समाजाला हिंदू समाजातील इतरांनी सापत्नभावाची वागणूक दिलेली असताना मुस्लिम समाजाने दिलेले सहकार्य विसरता येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर कोणी अडथळा बनू नका? मराठा समाज आज पिचला गेला आहे. अन्यायग्रस्त असल्याने संघर्ष करत आहे.
– जयेश खांडगेपाटील
पिंपळगाव, ता. जुन्नर, जि. पुणे



