स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com-८३६९९२४६४६
नवी मुंबई : भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी विलंबाने का होईना, पण बुधवारी, दि. ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली असून सानपाडा नोडमध्ये भाजपचा चेहरा म्हणून गेल्या काही वर्षांपासून ओळखल्या जाणाऱ्या पांडूरंग आमले यांची नवी मुंबई जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिका स्थापनेपासून सानपाडा नोडमध्ये भाजपचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. तथापि गेल्या काही वर्षांमध्ये भाजपच्या व्यासपिठावरुन सातत्याने जनहितैषी उपक्रम राबवित असल्याने पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून सानपाडा नोडमध्ये प्रथमच कमळ फुलणार असल्याचे विविध राजकीय घटकांमध्ये व सर्वसामान्य जनतेमध्येही चर्चा आहे. बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून सानपाडा नोडमध्ये पांडूरंग आमले जनसेवेचे कार्य करत सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असल्याने त्यांची भाजपचा एक चेहरा व आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे कट्टर समर्थंक अशी जनसामान्यांमध्ये ओळख निर्माण झालेली आहे. आज महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सानपाडा नोडमध्ये भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक चेहरे इच्छूक असले तरी विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांनी भाजप उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडल्याचे सानपाडावासियांनी जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे. सर्वच भाजपविरोधी प्रचार विधानसभा निवडणूकीमध्ये करत असताना पांडूरंग आमले यांनी बेलापूर विधानसभेतून भाजप उमेदवार मंदाताई म्हात्रे यांना विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली होती व मंदाताई म्हात्रे यांना लीडही पांडूरंग आमले यांनी सानपाडा नोडमध्ये मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.
कोरोना काळात सानपाडामधील जनतेला सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य पांडूरंग आमले यांनी केले होते. जनतेला कोरोना काळात पांडूरंग आमलेंनी केलेल्या मदतीचे दाखले आजही सानपाडावासियांकडून उघडपणे देण्यात येत आहेत. त्यानंतरही नवरात्रोत्सव, दहीहंडी, हळदीकुंकू, आरोग्य शिबिर व अन्य उपक्रमाचे आयोजन करताना पांडूरंग आमले हा भाजपचा सानपाडा नोडमधील आश्वासक चेहरा ही ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बॅनरबाजीची स्टंटबाजी न करता जनहितैषी कार्यक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचे कार्य पांडूरंग आमले यांच्यांकडून गेल्या काही वर्षांत सातत्याने केले जात आहे. याशिवाय सानपाडा नोडमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी व त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालिका आयुक्तांकडे आमले यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने पाठपुरावा केलेला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपद सांभाळताना त्यांनी पक्षसंघटना सानपाडामधील युवा वर्गांमध्ये जनताभिमुख करण्याला आमले यांनी प्राधान्य दिले. याशिवाय ते भाजपच्या अखिल भारतीय माथाडी युनियनचे पांडूरंग आमले नवी मुंबई जिल्हाध्यक्ष असून त्यांनी माथाडी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रेंच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे, बाजार समिती प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. बाजार आवारातील माथाडींच्या आरोग्य तपासणी आरोग्य शिबिर राबविण्यासाठी पांडुरंग आमले यांनी महापालिकेकडे पाठपुरावाही केलेला आहे. पांडुरंग आमले यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या परिश्रमाला न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया सानपाडावासियांकडून उघडपणे व्यक्त करण्यात येत आहे.



