नवी मुंबई : महापालिका प्रशासनातील शिक्षण विभागातील शाळांमध्ये शिकविणाऱ्या तासिका शिक्षकांना प्रशासनाकडून कधीही दिवाळी बोनस (सानुग्रह अनुदान) देण्यात आले नव्हते. या शिक्षकांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी त्यांनाही दिवाळीचा बोनस मिळावा यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियन पालिका प्रशासनाकडे गेल्या वर्षीपासून पाठपुराव करत होती. यंदा महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्याची दखल घेत तासिका शिक्षकांनाही १८ हजार ५०० रुपये दिवाळी बोनस (सानुग्रह अनुदान) जाहीर केला आहे. महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यामुळेच यंदाची आपली दिवाळी आनंददायी जाणार असल्याची भावना व्यक्त करत तासिका शिक्षकांनी कामगार नेते रविंद्र सावंत व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे आभार मानले आहेत.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र कर्मचारी युनियनने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांची भेट घेत शिक्षण विभागातील कायम शिक्षकांना ४० हजार रुपये तसेच ठोक मानधनावरील शिक्षकांना ३५ हजार रुपये, तासिका शिक्षकांना २० ते २५ हजार रुपये यासह महापालिकेतील तसेच परिवहन विभागातील कायम कर्मचारी-अधिकारी, कंत्राटी, ठोक मानधनावरील कर्मचारी, शिपाई, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, परिवहन विभागातील सर्वच आस्थापनेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदानाविषयी निवेदन सादर केले होते.
पालिका प्रशासनाकडून सर्वच आस्थापनेतील सर्वच संवर्गातील कर्मचारी अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्यात आला. त्यात तासिका शिक्षकांचाही प्रथमच समावेश करण्यात आल्याने तासिका शिक्षकांनी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थांने साजरी होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यामुळे हे शक्य झाले असल्याचे सांगितले.
कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त व अन्य महापालिका अधिकाऱ्यांचे आभार मानताना सानुग्रह अनुदान देताना तासिका शिक्षकांचा समावेश झाल्याबाबत आभार मानत अभिनंदन केले आहे. तथापि गतवर्षीच्या तुलनेत पालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानामध्ये केवळ १५०० रुपयांची वाढ झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. वाढती महागाई पाहता प्रशासनाने किमान ४ ते ५ हजार रुपयांची वाढ करणे गरजेचे होते. प्रशासनाने शक्य झाल्यास वाढती महागाई पाहता सानुग्रह अनुदानाबाबत विचार करुन किमान चार हजार रुपयांची तरी त्यात वाढ करावी, अशी मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.



