नवी मुंबई : सानपाडा सेक्टर तीनमधील गृहनिर्माण सोसायटींच्या प्रवेशद्वारासमोरील कचऱ्यांचे ढिगारे हटविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा भाजपचे सचिव पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर तीनमधील स्नेहबंधन व गुरुकृप्पा सोसायटीजवळील प्रवेशद्वारावर बाराही महिने कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळतात. महापालिका प्रशासन स्वच्छतेसाठी आग्रही भूमिका असताना अशा प्रकारच्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे सानपाडा परिसराला बकालपणा प्राप्त होत असतो. स्थानिक लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अशा प्रकारचे कचऱ्याचे ढिगारे निर्माण होवू नये यासाठी पालिका प्रशासनाने या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये प्रबोधनात्मक जनजागृती करावी. त्यांना कचरा संकलनासाठी डब्बे द्यावेत व त्यानंतरही त्या ठिकाणी कचरा आढळून येत असल्यास कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधित ठिकाणी असलेले कचऱ्यांचे ढिगारे तात्काळ हटविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



