सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर भाजप नवी मुंबई आयोजित आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सौजन्याने रविवारी कै. गणपतशेठ तांडेल मैदान येथे “कार्यकर्ता स्नेहसंमेलन मेळावा” उत्साह आणि ऊर्जेच्या वातावरणात पार पडला.
सदर मेळाव्याच्या माध्यमातून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांची दिवाळी गोड व्हावी याकरिता सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. दीपावली म्हणजे प्रकाशाचा, ऐक्याचा आणि सकारात्मकतेचा सण आणि हाच प्रकाश आज आपल्या कार्यकर्त्यांच्या एकतेत आणि आनंदात दिसला असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना यावेळी दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबईमधील आग्रोळी गावातील कन्या डॉ. आदिती दिलीप वैद्य हिने डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात एमडीएसमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळविण्याचा बहुमान प्राप्त केल्याबद्दल माजी विरोधी पक्ष नेता पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते डॉ. आदिती वैद्य हिचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर शिरवणे गाव, सेक्टर १, नेरूळ येथे २० ऑगस्ट २०२५ रोजी घरफोडी करण्यात आली होती. सदर घरफोडीमध्ये अंदाजे रु. २२ लाख ९० हजार रुपये किंमतीचे सोने व रोख रक्कम चोरीस गेली होती. त्या अनुषंगाने नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक ब्रह्मनंद नाईकवाडी व त्यांच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे व कासोशिच्या तपासामुळे चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल यशस्वीरित्या परत मिळविण्यात आला. या आपल्या कार्यपद्धतीतील शिस्त, बारकाईने केलेला तपास, आणि अत्यंत अल्प वेळेत मिळवलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल यशस्वी कामगिरी केल्याबद्दल पोलीस पथकातील पोलीस अधिकाऱ्यांचा देखील स्नेहसंमेलनात जाहीर सत्कार करण्यात आला.
तसेच येऊ घातलेल्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी काळातील दिशा आणि भूमिका यावर विचारमंथन करण्यात आले. कार्यकर्त्यांचा उत्साह, बांधिलकी आणि आत्मविश्वास पाहून आगामी वाटचालीबद्दल नवी उर्जा प्राप्त झाली असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी उपमहापौर अनिल कौशिक, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक पवार, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक राजू शिंदे, माजी नगरसेविका अनिता शेट्टी, युवा मोर्चा अध्यक्ष निकेतन पाटील, महामंत्री दत्ता घंगाळे, तुर्भे गावातील समाजसेवक दिलीप पाटील, राजू तिकोने, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



