सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या निवडणूका झाल्या, भाजप बहूमतात आले, महायुतीमधील शिवसेना पक्षाला ४२ जागांवर मजल मारुन विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. महापालिका स्थापनेनंतर प्रथमच स्विकृत नगरसेवकांची संख्या दहावर गेल्याने इच्छूकांच्या पालिका सभागृहात जाण्याच्या महत्वाकाक्षांना नव्याने उभारी मिळाली आहे. सभागृहातील संख्याबळानुसार भाजपला सहा तर शिवसेनेला चार स्विकृत नगरसेवक सभागृहात पाठविण्याची संधी मिळणार आहे. शिवसेना पक्षामध्ये स्विकृत नगरसेवकांसाठी चार जागांसाठी असंख्य इच्छूक निर्माण झाल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे.
नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर दोन विधानसभा मतदारसंघाचा विचार करता प्रत्येक मतदारसंघातून दोन स्विकृत नगरसेवक देणार असल्याची शिवसेनेत चर्चा आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश भिल्लारे, द्वारकानाथ भोईर, सुनिकेत हांडेपाटील यांच्या नावाची शिवसेनेत जोरदार चर्चा असून द्वारकानाथ भोईर यांच्या घरातील सदस्याला पालिका निवडणुकीत तिकीट मिळाले होते, परंतु ते पराभूत झाले. कोपरखैराणे हा वनमंत्री गणेश नाईकांचा निवासी भाग असून या परिसराकरता माजी नगरसेवक कै. देविदास हांडेपाटील यांचा मुलगा सुनिकेत हांडेपाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पालिका निवडणुकीत भाजपाने तिकिट डावलल्याने सुनिकेत हांडेपाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. संघटनात्मक पातळीवर लवकरच त्यांच्यावर जबाबदारी सोपविली जाणार असल्याची शिवसेनेत चर्चा आहे.
बेलापुर विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवकांच्या नावाचीच स्विकृत नगरसेवकांसाठी चर्चा जोरदार असून अनेकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काहींना पक्षातून स्पष्ट नकार देण्यात आला असल्याची शिवसेनेत चर्चा सुरु आहे. सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे मातब्बर प्रस्थ असलेले नामदेव भगत, कामगार नेते रविंद्र सावंत, शहरप्रमुख विजय माने, दिलीप घोडेकर, सोमनाथ वासकर, रंगनाथ औटी, रतन मांडवे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांचेही नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार सुजाता पाटील यांनी सुनिता मांडवे यांना पराभूत केले होते. सुनिता मांडवे म्हणजे शिवसेनेचा हमखास विजय असे नवी मुंबईत राजकीय चित्र असताना नेरूळ पश्चिमला आलेल्या भाजपच्या राजकीय वावटळीत त्यांचा पराभव झाला. नेरूळ पश्चिममध्ये असलेला पश्चिम महाराष्ट्राचा जनाधार व सलग दोन वेळा मांडवे परिवाराने सभागृहात शिवसेना नगरसेवक म्हणून केलेले कार्य तसेच घरातील रतन मांडवे, सुनिता मांडवे व पुत्र निखिल मांडवे संघटनात्मक पातळीवर सक्रिय असल्याने महिला महापौर भाजपने दिली असल्याने स्विकृत नगरसेवकपदी सुनिता मांडवेंना विराजमान करण्याची खेळी शिवसेना खेळण्याची शक्यता आहे. कामगार नेते रविंद्र सावंत यांची स्वत:ची कामगार संघटना, आंबेडकरी समाजाचा चेहरा व पालिका प्रशासनावर पकड पाहता शिवसेना आंबेडकरी समाजामध्ये संघटना विस्तार करण्याच्या दृष्टीने रविंद्र सावंत यांनाही शिवसेना संधी देण्याची शक्यता शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.



