नवी मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच झालेल्या महासभेदरम्यान महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना उपनेते विजय चौगुले यांची निवड झाली आहे. १११ सदस्यांच्या सभागृहात सत्ताधारी भाजप ६६ नगरसेवक (एका अपक्षाचे समर्थंन), ४२ शिवसेना नगरसेवक, दोन उबाठा गट, एक मनसे असे संख्याबळ आहे.
विजय चौगुलेसारखा आक्रमक व खमक्या चेहरा विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्याने पक्षाने योग्य निवड केल्याची प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यापासून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक सातत्याने राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेचा समाचार खासदार नरेश म्हसके व शिवसेना उपनेते विजय चौगुले घेत असतात. विजय चौगुले यांनीही गणेश नाईकांवरही अनेक आरोप करत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत काहीही बोलल्यास सहन केले जाणार नसल्याचा इशारा यापूर्वी अनेकदा दिला आहे.
विजय चौगुले यांच्यासोबत शिवसेनेचे ४१ नगरसेवक असल्याने सभागृहात सत्ताधारी पक्षाला काम करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भाजपला अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदाची धुरा विजय चौगुले यांच्याकडे सोपविले असल्याचे नवी मुंबईतील राजकारणात बोलले जात आहे. विजय चौगुले हे ज्येष्ठ नगरसेवक असून स्थायी समिती सभापतीपासून त्यांनी महापालिकेत विविध पदे भूषविली आहेत. सिडको संचालक म्हणूनही त्यांनी काम सांभाळले आहे. प्रशासकीय अनुभव त्यांचा दांडगा असून अनेक पालिका अधिकाऱ्यांसमवेत त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने भाजपला शिवसेनेच्या विरोधाचा सभागृहात सामना करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यातच भाजप नगरसेवकांमध्ये सध्या अंर्तगत असलेल्या गटबाजीचाही विजय चौगुले यांना फायदा मिळण्याची शक्यता आहे.
