नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठ मधील समाधान बारच्या लगत असलेल्या सारसोळे कोळीवाडा बसथांब्याचे नुतनीकरण करण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई सरचिटणिस निखील मांडवे यांनी परिवहन महाव्यवस्थापकांकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर आठमध्ये डॉ. डी.वाय. पाटील कॉलेजकडून स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावरुन सारसोळे बसडेपोकडे वळसा मारल्यावर समाधान बारच्या लगतच सारसोळे कोळीवाडा बसस्थानक आहे. आपण या बसथांब्याची पाहणी केल्यास या बसथांब्याची दुरावस्था आपल्या निदर्शनास येईल. बसथांब्याला आजमितीला केवळ सांगाड्याचे स्वरुप आले आहे. पावसाळ्यात या बसथांब्यातून गळती होत असते. बसथांब्याचे नुतनीकरण तातडीने करणे आवश्यक आहे. या बसथांब्याच्या नुतनीकरणासाठी माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनीही आपणाकडे लेखी पाठपुरावा केलेला आहे. या बसथांब्यामुळे संबंधित परिसराला बकालपणा आला आहे. परिसरातील अन्य बसथांब्यांचे नुतनीकरण करण्यात आलेले असून केवळ याच बसथांब्याची दुरावस्था झालेली आहे. बसथांब्याची दुरावस्था व तेथील समस्या पाहता आपण संबंधितांना बसथांब्याचे नुतनीकरण तातडीने करण्याचे निर्देश देण्याची मागणी निखील मांडवे यांनी परिवहन महाव्यवस्थापकांकडे केली आहे.


