स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अहमदाबाद येथे भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळविल्यामुळे देशभरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयाने क्रिकेट विश्वात भारताचा गौरव उंचावला आहे. भारतीय संघाने दाखवलेल्या जिद्द, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट सांघिक खेळामुळे पुन्हा एकदा क्रिकेट जगतात देशाचा अलौकिक गौरव झाला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ते बोलत होते.
या देदिप्यमान यशाबद्दल भारतीय क्रिकेट संघ, प्रशिक्षक मंडळ तसेच बीसीसीआयचे चेअरमन जय शाह यांचे राज्यशासन आणि राज्यातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करत भारतीय संघाची विजयी पताका अशीच उंचावत राहो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला. या विजयासह सलग दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असून भारताने २००७, २०२४ आणि २०२६ अशा तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला आहे. हा केवळ क्रिकेटमधील विजय नसून भारतीय खेळाडूंच्या जिद्दीचा, संघभावनेचा आणि विश्वासाचा प्रतीक असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार सूर्यकुमार यादव, फलंदाज संजू सॅम्सन, तसेच गोलंदाज जसप्रीत बूमरा यांच्यासह संपूर्ण संघाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत न्यूझीलंडला पराभूत केले, तर संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन घडवले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुंबई : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील आतापर्यंत सीसी दिलेल्या इमारतींपैकी बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या प्रश्नी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेऊन ओसी देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात येत आहेत, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत सदस्य स्नेहा दुबे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, वसई-विरारमधील सुमारे दोन हजार तीनशे इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. एक हजार दोनशे इमारतींना यापूर्वीच भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. वसई-विरार विकास कामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ जुलै २०२५ रोजी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत बांधकामांना परवानगी देताना सर्व कायदेशीर बाबी काटेकोरपणे तपासून या क्षेत्रात भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत अभय योजना लागू करावी तसेच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी धोरण निश्चित करावे असे निर्देश दिले होते. वसई – विरार क्षेत्रात मुंबईच्या धर्तीवर ‘अभय योजना’ लागू करण्याबाबत शासन गांभीर्याने विचार करत आहे प्रलंबित ओसीचा प्रश्न सुटल्यास रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा आणि इतर महापालिका सुविधा मिळणे सुलभ होईल. खासगी एजन्सीमार्फत सुरू असलेले इमारतींचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी सांगितले.
