संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला केंद्रीत स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महिलांना सहभागी करुन घेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
त्यानुसार बुधवारी (दि. ११ मार्च) नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी, कान,नाक,घसा तपासणी, नेत्र तपासणी, पॅथोलॉजी, रक्त तपासणी अशाप्रकारे ४५० हून अधिक महिला स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आली तसेच अधिक तपासणीची गरज जाणवलेल्या महिला स्वच्छताकर्मींना महापालिका रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले.
यावेळी आयोजित रक्तदान शिबीरात ५०हून अधिक नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी सेवाभावी दृष्टीने रक्तदान केले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी आरोग्य शिबीराच्या ठिकाणी भेट देत कामकाजाची पाहणी केली.
अशाप्रकारे स्वच्छताकर्मींच्या आरोग्य तपासण्या नियमित करण्यात याव्यात व त्यांच्याकडे आपल्या आरोग्य स्थितीचा रेकॉर्ड असावा, यादृष्टीने त्यांना हेल्थ कार्ड देण्यात यावे, ज्यावर त्यांच्या तपासण्यांचा तपशील नोंदीत राहील. याद्वारे त्यांची प्रत्येक कालावधीतील आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी उपयोग होईल, असे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिले.


