प्रतिकूल परिस्थितीतही जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा डौलाने फडकतोय : महेंद्रशेठ घरत
संघटन म्हणजेच पाठीचा कणा : रागिणी नायक
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : ‘कुठल्याही पक्षाची बांधणी करताना संघटन महत्त्वाचे असते. संघटन म्हणजेच पाठीचा कणा आहे. तो भक्कम असेल तर आपण सक्षमपणे उभे राहू शकतो. त्यामुळे संघटन सृजन अभियान राबविण्याची भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतली जात आहेत. माझ्याकडे रायगडची जबाबदारी दिली आहे. रायगड म्हणजेच शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेली भूमी. या भूमीत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे. संघटना वाढवण्यासाठी काँग्रेसने हे अभियान सुरू केले आहे,” असे काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रागिणी नायक शेलघर येथे म्हणाल्या.
शेलघर येथे संघटन सृजन अभियान सोमवारी राबवण्यात आले. यावेळी उरण तालुक्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, “काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी नेहरू, गांधी यांच्या विचारांची गरज आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसला साथ देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.”
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, “काँग्रेस वाढवण्यासाठी मी जिल्हाध्यक्ष या नात्याने कार्यकर्त्यांच्या बळावर काँग्रेसचा झेंडा टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची सुनामी आली असतानाही आम्ही दोन जागा जिंकून जिल्हा परिषदेत डौलाने काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.”
यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, प्रदेश सरचिटणीस प्रदीप राव, मिलिंद पाडगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, अॅड. अविनाश ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, महिला अध्यक्षा रेखा घरत, निर्मलाताई पाटील आणि शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
