नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील समाजमंदिर स्थानिक रहिवाशांसाठी तातडीने खुले करण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेचे समाजमंदीर आहे. स्थानिक रहिवाशांना वाढदिवस, विवाह, साखरपुडा, हळदीकुंकू यासह अन्य कौंटूबिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम राबविताना समाजमंदिराचा वापर करता येत होता. महापालिकेने कुकशेतमधील नागरी आरोग्य केंद्र अक्षरश: हाकेच्या अंतरावर असताना या समाजमंदिरात आरोग्य उपकेंद्र उघडण्यासाठी समाजमंदिर स्थानिक रहिवाशांसाठी बंद केले. तथापि या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र चालविण्यास सर्वपक्षीय राजकीय घटकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक रहिवाशांनी विरोधही केला. निदर्शने करण्यात आली. लेखी पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र बंद करण्यात आले. तथापि आरोग्य उपकेंद्र बंद करण्याच्या घटनेला वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटलेला असतानाही महापालिका प्रशासनाने समाजमंदिर अजून सुरु केलेले नाही. आरोग्य विभाग व मालमत्ता विभाग यात टोलवाटोलवी सुरु असल्याने समाजमंदिर अजूनही बंदच आहे. समाजमंदिर बंद असल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. नेरूळमध्ये अन्य ठिकाणी असलेले महागडे हॉल भाड्याने घेवून त्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. स्थानिक शिवसेना पदाधिकारी महादेव पवार सातत्याने समाजमंदिर सुरु करण्यासाठी पाठपुरावा करत असतानाही महापालिका तिकडे कानाडोळा करत आहे. समाजमंदिर बंद असल्याने नागरिकांना कार्यक्रमासाठी इतरत्र धावपळ करावी लागत आहे. भरमसाठ पैसा खर्च करावा लागत आहे. समाजमंदिर सुरु करण्यासाठी नागरिक मागणी करत आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता, आपण या ठिकाणी बंद असलेले समाजमंदिर तातडीने सुरु करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.
या समस्या निवारणासाठी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लेखी निवेदन सादर केले आहे.
