जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
जुन्नर : येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यात पडून उंब्रज येथील अक्षय यशवंत शिंगोटे (वय २८) व प्राजक्ता अक्षय शिंगोटे (वय २५) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ३०) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर तब्बल ४० तासांनी बुधवारी (दि. १) सकाळी सुमारे १० वाजता लेंडेस्थळ येथे दोघांचेही मृतदेह आढळले.
सोमवारी सायंकाळी काळवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कालव्याच्या पुलाजवळ काही नागरिकांना एक लहान बालक कालव्याच्या कडेला उभे राहून आई-वडिलांना हाका मारताना दिसले. नागरिकांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेतली असता, तेथे चप्पल आढळली. कालव्याकडे लक्ष दिल्यावर संबंधित दाम्पत्य पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूरपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र यश आले नाही. त्यानंतर बोटीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू ठेवण्यात आले, परंतु कालव्यातील तीव्र प्रवाहामुळे अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान उंब्रज व काळवाडी गावचे सरपंच हिरामण शिंगोटे, तुषार वामन तसेच उंब्रजचे पोलिस पाटील राहुल हांडेपाटील आणि ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे कालव्यातील पाणी कमी करण्याची मागणी केली. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली. आळेफाटा पोलिस ठाण्याकडूनही याबाबत पत्र देण्यात आले होते. अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांनी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जुन्नर येथील शिवनेरी रेस्क्यू टीमच्या दहा सदस्यांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. घटनेच्या ठिकाणापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर लेंडेस्थळ येथे दोघांचेही मृतदेह सापडले. यानंतर पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील राहुल हांडेपाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.

