‘स्वच्छ सर्वेक्षण’ २०२५-२६ मध्ये नवी मुंबई स्वच्छतेसोबतच होणार ‘सुगंधी’
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : स्वच्छतेमध्ये देशात आणि राज्यात अग्रस्थानी असलेल्या नवी मुंबई शहराने आज ‘सुगंधी शहर’ बनण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापौर सौ. सुजाता पाटील यांच्या हस्ते, उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून, वाशीगावात ‘सुगंधी अंगण अभियान’ या अभिनव मोहीमेचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. ‘सुंदर माझे अंगण, सुगंधी माझे शहर’ हे या अभियानाचे घोषवाक्य असून अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण महापौर सौ. सुजाता पाटील यांनी केले.
वाशीगावच्या पारंपारिक गावदेवी जत्रोत्सव पालखी सोहळ्याचे औचित्य साधून या व्यापक लोकचळवळीला सुरुवात करण्यात आली असून जत्रोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाला ‘स्वच्छता व पर्यावरण संरक्षण’ आणि ‘सामाजिक भान’ यांची जोड देण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आलेला आहे. यावेळी वाशीगावातील युवक-युवतींनी पारंपारिक कोळी वेशात रॅम्प वॉक सादर केला.
नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी उपमहापौरांच्या या अभिनव संकल्पनेचे कौतुक करीत नवी मुंबईतील सर्व गावांमध्ये तसेच संपूर्ण शहरात हे अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल असे सांगितले. नवी मुंबई आता स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नियमित क्रमवारीपेक्षा वरच्या दर्जाच्या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट असून हे अभियान या कामाला गती देईल. कोणत्याही अभियानात लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगत या अभियानाच्या माध्यमातून नागरिक ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतात त्याप्रमाणेच आपल्या घरापुढील परिसर स्वच्छ ठेवतील व त्याठिकाणी सुगंध देणाच्या फुलझाडांची लागवड करून आपले अंगणही सुगंधी करतील अशा विश्वास महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी महापौर सौ. सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, कार्यक्रमाचे निमंत्रक नगरसेवक निशांत भगत व प्रिती भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, कार्यकारी अभियंता पंढरीनाथ चौडे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजूसिंह चव्हाण व नरेश अंधेर, माजी नगरसेविका फशीबाई भगत व वैजयंती भगत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सुगंध असतो तिथे सुंदरता असते आणि सुंदरता असते तिथे स्वच्छता असतेच या भूमिकेतून स्वच्छतेत अग्रभागी असलेले नवी मुंबई शहर आता सुगंधी शहर म्हणून नावारूपाला यावे अशी वनमंत्री गणेश नाईक यांची संकल्पना असून त्यानुसार हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती उपमहापौर दशरथ भगत यांनी दिली. शहराला स्वच्छ आणि सुगंधी बनवण्यासाठी नवी मुंबई महापालिका आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करणाच आहे, परंतु नागरिकांनीही हे आपले दायित्त्व मानून घराचे अंगण आणि सार्वजनिक जागा सुगंधित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करीत विशेषत्वाने दुर्लक्षित पडीक जागा, ठिकाणे यांच्या स्वच्छतेकडे व सुशोभिकरणाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सभागृह नेते सागर नाईक यांनी उपमहापौरांची ही संकल्पना स्वच्छता अभियानाला नवे स्वरूप देणारी असल्याचे सांगत त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. नवी मुंबई शहरातील स्वच्छता आपण केवळ नंबरात येण्यासाठी नाही तर इथल्या प्रत्येक नागरिकाच्या समाधानासाठी करीत असून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या एकत्रीत सहभागातून हे सुगंधी अंगण अभियान सर्वत्र राबविले जाईल असे ते म्हणाले.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी याप्रसंगी बोलताना नवी मुंबईत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची, मोहीमांची विशेष दखल सर्व स्तरावर नेहमीच घेतली जाते तशीच या स्वच्छतेच्या एक पाऊल पुढे असलेल्या आगळ्यावेगळ्या सुगंधी अभियानाची दखल सर्वत्र घेतली जाईल व त्याच्या प्रतिकृती इतरही शहरांत उमटतील असा विश्वास व्यक्त केला. या अभियानात लोक स्वयंस्फुर्तीने पुढे येतील असे ते म्हणाले.
नगरसेवक निशांत भगत यांनी नवी मुंबई शहराच्या सुपर स्वच्छतेमधील अग्रक्रमात नागरिकांच्या यामधील सहभागाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. आता एक पाऊल पुढे टाकत केवळ ‘स्वच्छ’ शहर नाही, तर ‘सुगंधी’ शहर बनवायचे आहे. त्याची जबाबदारी नागरिकांनी आपल्या खांद्यावर घ्यावी. वाशीगावातील गल्ल्यांमधून सुरू झालेले हे अभियान देशभर पसरावे असाही संकल्प त्यांनी व्यक्त केला.
केवळ पायाभूत सुविधा म्हणजे प्रगती नव्हे, तर शहराचे सौंदर्य जपण्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा आहे, हा विचार या अभियानाच्या केंद्रस्थानी आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरासमोरील अंगण आणि इमारतीचे आवार स्वच्छ ठेवण्यासोबतच, परिसरातील सार्वजनिक जागा (फुटपाथ, चौक, वाचनालय किंवा बस स्टॉप) ‘दत्तक’घेऊन तिथे सुगंधी फुलांच्या झाडांची लागवड व संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
नागरिकांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात बोलताना जयदास सूर्यवंशी यांनी सर्व नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. आपले वाशीगाव व नवी मुंबई शहर सुंदर आणि सुगंधी करण्याची जबाबदारी आपली असून घर, इमारतीचे अंगण आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता आणि फुलझाडांची लागवड करून त्या जागा सुगंधी ठेवण्याची जबाबदारी आपण घेऊया असे म्हणत त्यांनी सर्वांना हात उंचावून अभियानात सहभागी होण्याची शपथ दिली.
*‘सुगंधी अंगण अभियान’*
*प्रमुख वैशिष्ट्ये:*
* घोषवाक्य : ‘सुंदर माझे अंगण, सुगंधी माझे शहर’.
* दत्तक अंगण संकल्पना : सार्वजनिक जागांच्या सौंदर्यीकरणासाठी नागरिकांचा थेट सहभाग.
* सकारात्मक वातावरण : सुगंधी झाडांमुळे शहरात केवळ प्रसन्नताच नाही, तर सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे.
* प्रत्येक कोपरा स्वच्छ : मुख्य रस्त्यांसोबतच अंतर्गत गल्ल्या आणि दुर्लक्षित कोपऱ्यांच्या स्वच्छतेवर विशेष भर.
* लोकसहभाग : गृहनिर्माण संस्था



