लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची महापालिकेत धडक कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाशी संबंधित बिल प्रकरणात उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणा आणि पारदर्शक कारभारावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ सुरवसे या कंत्राटदाराने ऐरोली विभागात १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अतिक्रमण हटविण्याची कामे केली होती. या कामाचा मोबदला मिळवण्यासाठी त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला असता, संबंधित बिल मंजूर करून देण्यासाठी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गायकवाड यांनी ४२ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप सुरवसे यांनी केला.
या मागणीमुळे त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर मंगळवारी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नवी मुंबई विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. त्यानुसार, महापालिकेच्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात गायकवाड यांनी लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
ही कारवाई अत्यंत गुप्ततेने पार पडली असून, संबंधित अधिकाऱ्याला कार्यालयातच पकडल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिकच अधोरेखित झाले आहे. या घटनेनंतर महापालिकेतील आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारदार दशरथ सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभराच्या कामाचे एकूण दीड कोटींचे बिल थकीत होते. त्यापैकी २१ लाखांचे बिल घेण्यासाठी म्हणून सुरवसे गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्यापैकी २१ लाखांचे २ टक्के रक्कम लाच स्वरूपात मागीतल्याची माहिती सुरवसे यांनी दिले.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी केली जात आहे. महापालिका प्रशासनाकडूनही या घटनेची स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



