नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्यांच्यामागे कोणाचे संरक्षण आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून यापूर्वी सेवेतून बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशासनात संधी दिली जाणे ही गंभीर बाब असून त्यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
आमदार म्हात्रे यांनी बुधवारी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेत विविध प्रलंबित आणि वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा केली. गायकवाड प्रकरणी बोलताना, कारवाई झाल्यानंतर केवळ त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून थांबू नये, तर त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय, त्यांचे संपर्क आणि संभाव्य राजकीय पाठबळ, कोण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय? याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी ठाम मागणी म्हात्रे यांनी केली.
“भ्रष्टाचार करूनही पुन्हा पदावर येता येते, असा संदेश प्रशासनात गेला तर चुकीच्या प्रवृत्ती वाढीस लागतील,” असा इशाराही त्यांनी दिला. या संबंधी आयुक्तांशी सविस्तर चर्चा झाली असून, नवी मुंबई महापालिकेच्या नावलौकिकाला ही घटना गालबोट लावणारी असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शहरातील वादग्रस्त प्रकल्प, विशेषतः प्रस्तावित हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज प्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. याशिवाय, शहरभर उभारण्यात आलेल्या अवैध कमानी, जाहिरात फलक आणि होर्डिंग्समुळे नवी मुंबईचे विद्रूपीकरण होत असल्याची टीका करत, या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच महापालिकेच्या शाळेत शिक्षक भरती प्रक्रियेसाठी एका महिला मंडळाला काम देण्यात आल्याच्या मुद्द्यावरही म्हात्रे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


