मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर होत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु असताना पवार घराण्यांच्या नव्या पिढीमध्ये कलगीतुरा सुरु झाला आहे. मतदानाच्या दिवशीच आगामी उमेदवारीवरुन झालेला शाब्दिक खेळ पाहता बारामतीचा राजकीय वारसा मिळविण्यासाठी जय, युगेंद्र आणि रोहित पवार यांच्यातील संघर्षाची ही नांदी मानली जात आहे.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकी दिवशीच पवारांच्या तिसऱ्या पिढीतील संघर्षाची नौबत झडली आहे. २०२९ साली होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २०२९ ला आपण बारामती विधानसभेची निवडणूक लढवू शकतो, असे जय पवारांनी म्हणताच त्यांचे चुलत बंधू आमदार रोहित पवार यांनी बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार संघर्ष पहायला मिळू शकतो, असे म्हणत एक प्रकारे जय पवारांना आव्हान दिले आहे.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत भाषण करण्यासाठी सुनेत्रा पवार उभ्या ठाकल्या आणि त्यांच्या पाठीमागे जय पवार उभे राहिले. संपूर्ण भाषणादरम्यान जय पवार स्क्रीनवर दिसतील, याची खबरदारी घेतली गेली. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आघाडी जय पवारांनीच सांभाळली होती. त्यामुळे पत्रकारांनी २०२९ च्या उमेदवारीबाबत विचारले असता, जय पवारांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. पण याच पोट निवडणूकीसाठी रोहित पवार यांनीही बारामती विधानसभेचा मतदारसंघ पिंजून काढला होता. काकींसाठी आपण प्रचार करत असल्याचे रोहित पवार सांगत होते. मात्र, जय पवारांनी बारामतीवर दावा करताच रोहित पवारांनी २०२४ च्या पवार विरुद्ध पवार संघर्षाची पुनरावृत्ती होऊ शकते, असे म्हणत त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचाही दावा केला आहे. पण सत्तेच्या या खेळाचा तिसरा कोन देखील आहे. तो म्हणजे युगेंद्र पवार. २०२४ ला अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांनी बारामती विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे ते देखील रिंगणात असू शकतात. याप्रकरणी अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे म्हणत युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवारांनी रोहित आणि जय या दोघांनाही सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.
शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
१९६७ ला शरद पवारांनी वयाच्या २७ व्या वर्षी विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा जिंकली. त्यांचा वारसा पुढे चालवला तो अजित पवारांनी. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात शरद पवारांनी सत्तेची वाटणी हुशारीने केली होती. अगदी राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर देखील तुटेपर्यंत ताणायच नाही, याचे भान या दोन्ही नेत्यांना होते. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कितीही स्थित्यंतरे झाली तरी पवार म्हणजे बारामती हे समीकरण कायम राहिले. अर्थात कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार यातून मार्ग काढतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

