नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील तानाजी मालुसरे क्रिडांगणातील पावसाळी गटाराची तळापासून सफाई करुन आतील गाळ, माती, दगडी व अन्य साहीत्य काढण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीत महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या क्रिडांगणाच्या एका भागात मॉर्निंग वॉकच्या लगत पावसाळी गटर आहे. या पावसाळी गटराची कधीही सफाई केली जात नसल्याने गटारातील अस्वच्छतेमुळे क्रिडांगण व उद्यानात येणाऱ्या रहिवाशांना बाराही महिने डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. या गटारामध्ये माती, गाळ, दगडी व अन्य साहित्य पडलेले असून त्यातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे.गटाऱावरील झाकणे (सिमेंटचे ठोकळे) निघाली असून काही झाकणे गटारात पडल्याचे नेहमीच पहावयास मिळत आहे. सध्या महापालिका प्रशासनाकडून पावसाळीपूर्व कामे सुरु असल्याने तानाजी मालुसरे क्रिडांगणातील गटाराची तळापासून सफाई करताना त्यातील गाळ, माती, दगडी व अन्य साहित्य तातडीने हटविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिकेकडे व मंत्रालयाकडे केली आहे.
