कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथची (पीए) बुधवारी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी कोलकात्यात त्यांना लक्ष्य करून, एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ रथ हे गेल्या १० ते १२ वर्षांपासून सुवेंदू अधिकारी यांच्याशी संबंधित होते आणि ते त्यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रचाराची महत्त्वाची कामेही सांभाळली होती.
ही घटना मध्यमग्राम (उत्तर २४ परगणा जिल्हा) येथे घडली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंद्रनाथ रथ हे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत बसलेले असताना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य केले. हल्लेखोरांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात रथ यांच्यावर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे.
दरम्यान, भाजप नेते सुवेंदू अधिकारी स्वतः घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही हत्या राजकीय कारणांमुळे झाली का, की यामागे इतर काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या घटनेमुळे पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
