अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनापासून सातत्याने पर्यावरण विषयक जाणीवजागृती करणारे उपक्रम राबविण्यासोबतच वृक्षारोपण, सखोल स्वच्छता मोहीमा, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने माहिती प्रचार अशा विविध मोहीमा राबविल्या जात आहेत. ५ ते १२ जून या कालावधीत असे कार्यक्रम सातत्यपूर्ण राबविण्यात आले.
अशाच प्रकारचा पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्लास्टिकविषयी जनजागृती करण्याच्या उपक्रमासोबतच एकल वापर प्लास्टिकला प्रतिबंध करण्यासाठी तपासणी मोहीमांचेही सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने १२ जूनला आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विशेष प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली.
या विशेष मोहीमेमध्ये प्लास्टिक पिशव्या आणि एकल वापर प्लास्टिकचा उपयोग करताना आढळलेल्या ३० व्यावसायिक आणि आस्थापना यांच्यावर कारवाई करीत त्यांच्याकडून १ लक्ष ५५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली तसेच साधारणत: १५८ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला.
यामध्ये बेलापूर विभागातून ३० हजार दंडात्मक रक्कम आणि १० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच नेरूळ विभागातून १० हजार दंडात्मक रक्कम व ५ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिकची जप्ती करण्यात आली. वाशी विभागातून ५ हजार दंडात्मक रक्कम व ५ किलो प्लास्टिक साठा आणि तुर्भे विभागात ८ व्यावसायिक / आस्थापना यांचेकडून ४५ हजार दंडात्मक रक्कम तसेच तब्बल १०० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
कोपरखैरणे विभागातून २० हजार दंडात्मक वसूली आणि २ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त तसेच घणसोली विभागातून ३० हजार दंडात्मक वसूली आणि २८ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले. ऐरोली विभागातूनही १५ हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि ८ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे तसेच परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे आणि परिमंडळ २ उपआयुक्त संजय शिंदे यांच्या माध्यमातून सर्व विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त यांनी आपल्या कर्मचारी पथकांद्वारे ही प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहीम राबविली.
प्लास्टिक हे हजारो वर्षे नष्ट होत नसल्याने पर्यावरणाला व मानवी जीवनाला हानीकारक असणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे हे अत्यंत महत्वाचे असून नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर सुरू करावा व प्रतिबंधात्मक एकल वापर प्लास्टिकला आपल्या जीवनातून हद्दपार करावे असे आवाहन करण्यात येत आहे.


