हाजी शहनवाज खान यांचे उलेमा, इमाम आणि नागरिकांना साकडे
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्रातील विशेषतः कोकण विभाग, रायगड जिल्हा आणि नवी मुंबई परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर समाजसेवक हाजी शहनवाज खान यांनी उलेमा-ए-किराम, मशिदींचे इमाम आणि सर्व नागरिकांना पावसासाठी विशेष दुआ (सलातुल इस्तिस्का) करण्याचे आवाहन केले आहे.
हाजी शहनवाज खान यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पाऊस ही अल्लाह तआलाची मोठी नेमत आणि रहमत आहे. अशा कठीण परिस्थितीत सर्वांनी तौबा, इस्तिगफार आणि प्रामाणिक अंतःकरणाने अल्लाहच्या दरबारात हात उंचावून रहमतच्या पावसासाठी दुआ करावी.
“या अल्लाहा, आपल्या रहमतेचा पाऊस बरसव. तहानलेल्या जमिनीला जीवन दे, शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ दे, पाण्याचे संकट दूर कर आणि संपूर्ण महाराष्ट्रावर लाभदायक व भरपूर पाऊस बरसव.”
हाजी शहनवाज खान यांनी सर्व मशिदींमध्ये नमाजानंतर विशेष दुआ आयोजित करण्याचे तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातूनही पावसासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. हा काळ समाजहितासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि मानवतेच्या भल्यासाठी एकजुटीने अल्लाहकडे रहमत मागण्याचा असल्याचे त्यांनी सांगितले.



