अतिक्रमण विभागाची दुटप्पी भूमिकेवर नेरूळवासियांकडून संताप
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील विक्रम बारमधील अतिक्रमणावर नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दोन दिवसापूर्वीच कारवाई करण्यात आली. बारच्या समोरील अतिक्रमण आणि बारच्या वरील अतिक्रमण यावर भरदुपारी कारवाईचा हातोडा चालविण्यात आला. मात्र याच नेरूळ सेक्टर सहामधील वाहतुक कोंडीला खतपाणी घालणारी अतिक्रमणे, नेरूळ सेक्टर आठमधील बिअर बार तसेच देशी दारुविक्रीच्या ठिकाणावरील अतिक्रमणावर नेरूळ महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डींग व बॅनर लागून बकालपणा वाढतोय, महापालिकेचा महसूल बुडतोय, तक्रारी येवूनही कारवाई होत नाही, पुरावे देवूनही फौजदारी गुन्हे दाखल होत नाही. त्यामुळे इतर अतिक्रमणाला राजाश्रय देणाऱ्या नेरूळ विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाच्या दुटप्पी भूमिकेविषयी नेरूळवासियांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील विक्रम बारच्या विरोधात ठराविक घटकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात असल्याने महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. तथापि नेरूळ सेक्टर आठमधील सिंदूर बार, कल्पना बार, समाधान बार यांच्या मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमणावर महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. नेरूळ सेक्टर आठमधील एल मार्केटमधील देशी दारूच्या चालकाने सभोवतालच्या जागेवर अतिक्रमण करुन व्यवसाय केला जात आहे. याबाबत अनेकदा तक्रारी जावूनही महापालिका प्रशासन देशी दारु विक्रेत्याची मर्जी सांभाळत आहे.
नेरूळ सेक्टर सहा व चारमधील चौकात सातत्याने वाहतुक कोंडी होत आहे. या चौकात असणाऱ्या व्यावसायिकांनी मार्जिनल स्पेस पूर्णपणे बळकावला असून येथे येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतुक कोंडी होत आहे. शनिवार-रविवारी सांयकाळी या ठिकाणाहून ये-जा करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील झामा, टायरचे दुकान, प्रशांत कॉर्नर, मसाला सेंटर या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी असते. येथील मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमणे हटवून दुकानातील ग्राहकांना वाहने उभी करण्यासाठी जागा मुबलक आहे. या दुकानांसमोर नो पॉर्किगचे फलक असतानाही वाहने खुलेआमपणे उभी राहतात. या दुकानांच्या मार्जिनल स्पेसवर महापालिकेने अथवा त्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या वाहतुक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही.
नेरूळ पश्चिमेला अनधिकृत बॅनर व होर्डींगचा बाराही महिने महापूरच असतो. यामुळे या परिसराला बकालपणा येवून महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसानही होत आहे. अनधिकृत बॅनरबाबत तक्रारी येवूनही महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत बॅनर लवकर हटवले जात नाहीत.अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महापालिका प्रशासनाला अधिकार आहेत. अनधिकृत बॅनरबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी गुगल मॅपसह तक्रारी करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तक्रारी अनेकदा करुनही या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात नाही. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे धाडस महापालिका प्रशासनाकडून दाखविले जात नाही. नेरूळ सेक्टर आठमधील एल मार्केटमधील दोन राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या अतिक्रमणासह अन्य अतिक्रमणावरही कारवाई करण्यास अतिक्रमण विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील विक्रम बारच्या अतिक्रमणावर तातडीने कारवाई आणि अन्य ठिकाणी उदासिनता दाखविणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या नेरूळ विभाग कार्यालयाची दुटप्पी भूमिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.