अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
अवघ्या सात-आठ मिनिटांत चोरी
गॅस कटरने ग्रील व शटर तोडून प्रवेश
सीसीटीव्हीवर स्प्रे मारला
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर-६ येथील मंगलमूर्ती भवन परिसरात रविवारी पहाटे चारच्या सुमारास ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून चोरट्यांनी तब्बल दोन किलो चांदीचे दागिने लंपास केले. इको गाडीतून आलेल्या तीन चोरट्यांनी अवघ्या सात-आठ मिनिटांत सफाईदारपणे चोरी करून पलायन केले. दुकानातील सोन्याचे दागिने तिजोरीत सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे नेरूळ परिसरातील सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मंगलमूर्ती भवन येथील भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान चोरट्यांनी लक्ष्य केले. पहाटे सुमारे चार वाजून दोन मिनिटांनी इको वाहनातून तीन जण दुकानाजवळ आले. त्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने दुकानाचे संरक्षक ग्रील कापले आणि त्यानंतर शटर तोडून दुकानात प्रवेश केला. चेहरा पूर्णपणे झाकलेल्या चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारून ते बंद करण्याचा प्रयत्न केला.
दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी काही मिनिटांतच चांदीचे दागिने गोळा केले. विशेष म्हणजे दुकानातील डिस्प्लेमध्ये ठेवलेल्या बनावट सोन्याच्या दागिन्यांना त्यांनी हातही लावला नाही. त्यामुळे चोरट्यांना सोन्या-चांदीची चांगली जाण असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. सोन्याचे दागिने तिजोरीत ठेवलेले असल्याने चोरट्यांना ते घेऊन जाता आले नाही. जाताना त्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा डिव्हायडरही सोबत नेला.
मंगलमूर्ती भवनच्या शेजारी असलेल्या दर्शन दरबारमधील वॉचमन सकाळी सहाच्या सुमारास गाड्या धुण्यासाठी रस्त्यावर आला असता त्याच्या निदर्शनास दुकानाचे शटर फोडल्याचे आले. त्याने याबाबत माहिती दिल्यानंतर दुकानमालक प्रल्हादसिंग राणा घटनास्थळी दाखल झाले. दुकानाची पाहणी केली असता सुमारे दोन किलो चांदी चोरीस गेल्याचे आढळून आले.
चोरट्यांकडून चोरीसाठी इकोचा वापर
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. दर्शन दरबारमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये इको वाहनातून तीन चोरट्यांचे आगमन आणि त्यानंतर काही मिनिटांत चोरी करून त्यांचे पलायन झाल्याचे दिसून आले आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेली इको गाडी यापूर्वीही एखाद्या गुन्ह्यात वापरण्यात आली आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.
रेकी करूनच चोरी?
चोरीची पद्धत आणि अवघ्या सात-आठ मिनिटांत करण्यात आलेली कारवाई पाहता चोरट्यांनी दुकानाची पूर्वीच रेकी केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे, ग्रील, शटर आणि दागिन्यांची मांडणी याबाबत चोरट्यांना माहिती असल्याचे त्यांच्या हालचालींवरून दिसून येत आहे.
नशेडींच्या वावरामुळे सुरक्षेला धोका
दरम्यान, नेरूळ सेक्टर-६ परिसरातील काही मोकळ्या मैदानांमध्ये आणि उद्यानांच्या आसपास रात्रीच्या वेळी नशा करणाऱ्या व्यक्तींचा वावर असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. पालिकेचे क्रीडांगण, उद्यान तसेच वरुणा आणि हिमालय सोसायट्यांच्या लगतच्या मैदानात रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्तींची वर्दळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील हालचालींचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. मात्र चोरीमागे याच व्यक्तींचा हात असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ज्वेलर्सच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
फिंगरप्रिंट पथकाने घटनास्थळी पाहणी करून ठसे घेतले असून गुन्हे शाखेच्या पथकांकडूनही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या हालचालींची तपासणी सुरू आहे. पहाटेच्या वेळी अवघ्या काही मिनिटांत झालेल्या या चोरीमुळे नेरूळ परिसरातील ज्वेलर्सच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
