खड्डे बुजविण्याची माथाडी संघटनेची मागणी
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा भुयारी मार्ग ते रिक्षा स्टॅण्डच्या प्रवेशद्वारादरम्यानचे सर्व खड्डे तातडीने बुजवावेत. तसेच या ठिकाणी पाणी साचणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग विठ्ठल आमले यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.
सानपाडा रेल्वे स्थानकाखालील भुयारी मार्गातून बाहेर पडताना सेक्टर ४-५ तसेच सेक्टर ६-७ कडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रिक्षा स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे घाण पाणी साचत असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहने ये-जा करतात. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून वाहन गेल्यानंतर बाजूने जाणाऱ्या वाहनांवर तसेच पदपथावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांवर घाण पाणी उडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविताना वाहनचालकांना अचानक वळावे लागत असल्याने किरकोळ अपघातांच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.
रस्त्यावरील खड्डे आणि त्यात साचणारे पाणी यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने केवळ खड्डे बुजविण्यापुरती कार्यवाही न करता पाण्याचा निचरा होण्यासाठीही ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी आमले यांनी निवेदनातून केली आहे.

