महाराष्ट्र कर्मचारी युनियनची परिवहन व्यस्थापकांकडे मागणी
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या मेडिक्लेम पॉलिसीचा कालावधी वाढविण्याची लेखी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या परिवहन उपक्रमाने कर्मचाऱ्यांकरीता एक वर्षाकरता मेडीक्लेम योजना लागू केली, त्याबाबत सर्वप्रथम आपले, महापालिका आयुक्तांचे व परिवहन सभापती, सदस्य, प्रशासनातील सर्वांचेच मनापासून आभार. परिवहनच्या कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र कर्मचारी यूनियन या कामगार संघटनेने गेल्या काही वर्षांत सातत्याने लेखी पाठपुरावा केला आहे. भेटीगाठी घेवून समस्येचे गांभीर्यही व वस्तूस्थिती आपल्या निदर्शनासही आणून दिलेली आहे. या पाठपुराव्याची दखल घेत कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे पुन्हा एकवार कर्मचारी वर्गाच्या वतीने निवेदनात आभार मानले आहेत.
मेडिक्लेम योजना मंजूर केली असली तरी ती योजना तात्काळ लागू करुन कर्मचाऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. आपण मेडिक्लेम योजना मंजूर केली असली तरी ही पॉलिसी केवळ एकच वर्षाची आहे. एक वर्ष संपल्यावर पुन्हा यासाठी निविदा काढावी लागणार. निविदा कालावधीसाठी प्रशासनदरबारी पुन्हा पाच ते सहा महिन्याचा अपव्यय होतो. या कालावधीत जुन्या योजनेचा कालावधी संपल्यावर नवीन पॉलिसी सुरु होईपर्यत कर्मचारी या सुविधेपासून वंचित राहणार. दरम्यानच्या कालावधीत अपघात अथवा मोठा आजार उद्भवल्यास खर्चाची जबाबदारी कोण उचलणार? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. वाढत्या महागाईच्या काळात तुटपुंज्या वेतनावर या कर्मचाऱ्यांवर आला दिवस ढकलावा लागत आहे. त्यामुळे एक वर्ष मुदतीत ही मेडिक्लेम योजना (पॉलिसी) संपुष्ठात येण्यापूर्वीच चार महिने अगोदर निविदा काढण्यात यावी. जेणेकरुन कर्मचाऱ्यांना विनाविलंब योजना सुरु राहील. तसेच दरवर्षी हा निविदेचा खेळ न करता कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम योजना किमान ३ ते ५ वर्षाकरता राबविण्यात यावी. मेडिक्लेम योजनेचा कालावधी अधिक असल्यास दरवर्षी निविदा मागविण्याचा प्रकारही संपुष्ठात येईल व कर्मचाऱ्यांवर योजनेचा कालावधी संपण्याबाबत भीतीची टांगती तलवारही राहणार नाही. समस्येचे गांभीर्य व मागणीतील वस्तूस्थिती पाहता परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांची मेडिक्लेम योजना एक वर्षाकरता न ठेवता ती तीन ते पाच वर्षांकरता राबविण्यात यावी आणि मंजूर केलेली मेडिक्लेम पॉलिसी विनाविलंब तात्काळ लागू करण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.
