‘चारही प्राधिकरणांनी एकत्र या, अंमली पदार्थांची कीड समूळ उपटा!’
श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
रेल्वे स्थानकांवर कायमस्वरूपी पोलीस बीट चौक्या उभारण्याचे महापौरांचे निर्देश; शाळा-कॉलेज, उद्याने, मैदाने, मार्केट आणि दुर्लक्षित जागांवरही विशेष नजर ठेवण्याची सूचना
नवी मुंबई : देशातील नियोजनबद्ध आणि विकसित शहर म्हणून नवी मुंबईची ओळख निर्माण झाली असताना, शहराच्या नव्या पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढणारे जाळे वाढत असल्याच्या तक्रारींनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे. रेल्वे स्थानक परिसरातील गर्दुल्ले, नशिल्या पदार्थांची अवैध विक्री, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील संशयास्पद हालचाली आणि शहरातील दुर्लक्षित जागांचा नशेसाठी होणारा वापर यावर आता महापौर सुजाताताई पाटील यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे.
“आज उंबरठ्यावर असलेला हा धोका उद्या आपल्या घरात येऊ नये, यासाठी आता वाट पाहून चालणार नाही. सर्व प्राधिकरणांनी एकत्र येऊन अंमली पदार्थांविरोधातील मोहीम युद्धपातळीवर राबवावी,” असा स्पष्ट आदेश देत सुजाताताई पाटील यांनी प्रशासनाला कामाला लावले आहे.
नेरूळ रेल्वे स्थानकावर नुकत्याच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर सुजाताताई पाटील यांनी संबंधित प्राधिकरणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समन्वय बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, महापालिका अधिकारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
‘नवी मुंबईच्या भविष्याशी खेळ होऊ देणार नाही!’
अंमली पदार्थांची विक्री आणि वापर हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून नवी मुंबईच्या भावी पिढीच्या अस्तित्वाशी निगडित गंभीर सामाजिक प्रश्न आहे, अशी भूमिका महापौरांनी बैठकीत मांडली.
रेल्वे स्थानकांच्या परिसरात गर्दुल्ले आणि नशिल्या पदार्थांच्या अवैध विक्रीमुळे विशेषतः मुले आणि युवकांना धोका निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही, तर त्याचे गंभीर सामाजिक परिणाम शहराला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
“अंमली पदार्थांची कीड शहरात पसरू देणे म्हणजे आपल्या मुलांच्या भवितव्याशी तडजोड करणे आहे. ही बाब कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” अशी ठाम भूमिका सुजाताताई पाटील यांनी घेतली.
चारही प्राधिकरणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश
नवी मुंबई शहरात विविध प्राधिकरणांचे कार्यक्षेत्र असल्याने अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत समन्वयाचा अभाव राहू नये, यासाठी महापौरांनी संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश दिले.
पोलीस, रेल्वे पोलीस, नवी मुंबई महापालिका तसेच सिडको या यंत्रणांमध्ये नियमित समन्वय असावा. प्रत्येक यंत्रणेने आपली जबाबदारी निश्चित करून कारवाईची प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी सूचना त्यांनी केली.
प्रत्येक रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी बीट चौकी!
अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी महापौरांनी नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांच्या परिसरात पोलीस बीट चौक्या उभारण्याची सूचना केली आहे.
या बीट चौक्यांमध्ये पोलीस, रेल्वे पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी उपलब्ध राहतील, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. केवळ एखादी घटना घडल्यानंतर धावपळ करण्याऐवजी रेल्वे स्थानक परिसरात सतत देखरेख आणि प्रतिबंधात्मक कारवाईची यंत्रणा उभी करण्यावर महापौरांनी भर दिला.
शाळा-कॉलेज परिसरावर विशेष नजर
अंमली पदार्थांचे जाळे केवळ रेल्वे स्थानकांपुरते मर्यादित नसल्याचे बैठकीत निदर्शनास आले. शहरातील विविध भागांमध्ये दुर्लक्षित जागा, पदपथ, उद्याने, मैदाने, मार्केट परिसर आणि इतर निर्जन कोपऱ्यांमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी मांडल्या.
याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षक तसेच प्राचार्यांकडूनही यासंदर्भात तक्रारी प्राप्त होत असल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
त्यामुळे रेल्वे स्थानकांबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विशेष लक्ष केंद्रित करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश सुजाताताई पाटील यांनी दिले.
‘शाळेच्या परिसरात पानटपरी नको’
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही अंमली पदार्थांचा प्रश्न सामाजिकदृष्ट्या अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. अंमली पदार्थांची साखळी तोडण्यासाठी प्रभावी निरीक्षण आणि नियंत्रण प्रणाली सातत्याने कार्यरत ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शाळांच्या परिसरात पानटपऱ्यांनाही परवानगी नसावी, अशी भूमिका आयुक्तांनी मांडली. अंमली पदार्थांची विक्री आणि वापर रोखण्यासाठी पोलीस, रेल्वे आणि सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रात्रीच्या वेळेतही नियमित गस्त वाढविण्याची गरज व्यक्त करत, या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले.
महापौरांच्या पुढाकाराचे सर्वांकडून स्वागत
नेरूळ स्थानकावरील नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर अंमली पदार्थांच्या विक्री आणि गर्दुल्ल्यांच्या प्रश्नावर तातडीने समन्वय बैठक बोलावल्याबद्दल उपस्थितांनी महापौर सुजाताताई पाटील यांचे आभार मानले.
लोकप्रतिनिधींनी शहरातील विविध भागांमध्ये अंमली पदार्थांचे जाळे कशा पद्धतीने कार्यरत असल्याची माहिती बैठकीत दिली. विशेषतः महिलांना आणि सामान्य नागरिकांना यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली.
‘नवी मुंबईची ओळख नशेच्या सावलीत जाऊ देणार नाही’
नवी मुंबईने नियोजनबद्ध शहर म्हणून देशभरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शिक्षण, पायाभूत सुविधा, स्वच्छता, क्रीडा आणि विकासाच्या विविध क्षेत्रांत शहराने मिळवलेली ओळख ही अभिमानाची बाब आहे. मात्र, अंमली पदार्थांसारख्या अनिष्ट प्रवृत्तीमुळे शहराची ही प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
“नवी मुंबईची ओळख देशभरात विकासाचे शहर म्हणून आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यामुळे या शहराचे नाव खराब होऊ देणार नाही. हा केवळ प्रशासनाचा विषय नाही; हा आपल्या प्रत्येकाच्या घराच्या सुरक्षिततेचा आणि आपल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष कारवाई करणे आवश्यक आहे,” असे सुजाताताई पाटील यांनी ठणकावले.
सुजाताताईंचा स्पष्ट संदेश—‘कारवाई कागदावर नको, मैदानात दिसली पाहिजे!’
अंमली पदार्थांविरोधातील कारवाई केवळ बैठका, सूचना आणि कागदोपत्री आदेशांपुरती मर्यादित न राहता त्याचा परिणाम प्रत्यक्ष शहरात दिसला पाहिजे, अशी स्पष्ट अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली.
रेल्वे स्थानकांपासून शाळा-कॉलेजपर्यंत, उद्याने आणि मैदाने ते बाजारपेठांपर्यंत संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
नवी मुंबईच्या नव्या पिढीला नशेपासून वाचवण्यासाठी आता प्रशासनाने ‘समन्वय, सतर्कता आणि कठोर कारवाई’ या त्रिसूत्रीने काम करावे, असा स्पष्ट संदेश महापौर सुजाताताई पाटील यांनी या बैठकीत दिला आहे.