अवघ्या नऊ महिन्यांत ३० लाख प्रवाशांचा टप्पा पार; २२,५०० उड्डाणे, ४६ शहरांशी कनेक्टिव्हिटी आणि अबुधाबीपर्यंत थेट झेप
श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक विमानसेवा सुरू केल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांच्या आत ३० लाख प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. १ सप्टेंबर रोजी हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठत नवी मुंबई विमानतळाने भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या नव्या विमानतळांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. अवघ्या काही महिन्यांत प्रवासीसंख्या, विमानसेवा आणि गंतव्यांचे जाळे झपाट्याने वाढल्याने पश्चिम भारताचे भविष्यातील महत्त्वाचे हवाई प्रवेशद्वार म्हणून नवी मुंबई विमानतळाची वाटचाल वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.
२५ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक देशांतर्गत विमानसेवा सुरू केली. त्यानंतरच्या काळात विमानतळाने प्रवासी वाहतुकीचा वेगाने विस्तार केला. आतापर्यंत सुमारे २२,५०० व्यावसायिक उड्डाणे हाताळण्यात आली आहेत. सुरुवातीला १३ गंतव्यांपासून सुरू झालेला प्रवास आता ४६ गंतव्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीला नवी दिशा मिळत असून, नवी मुंबईचे हवाई महत्त्व झपाट्याने वाढत आहे.
२०० दिवसांत आंतरराष्ट्रीय झेप
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानसेवेची सुरुवात. १५ जुलै २०२६ रोजी अबुधाबीला पहिली नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू झाली. म्हणजेच देशांतर्गत व्यावसायिक सेवा सुरू झाल्यानंतर २०० दिवसांच्या आत नवी मुंबई विमानतळाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीही आपली दारे खुली केली.
अबुधाबीशी थेट जोडणीमुळे नवी मुंबई केवळ देशांतर्गत प्रवासाचे केंद्र न राहता आंतरराष्ट्रीय हवाई नेटवर्कमध्येही वेगाने स्थान निर्माण करत आहे. आगामी काळात आणखी विमान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय मार्ग जोडण्याचे नियोजन असल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराला आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे.
४६ शहरांशी कनेक्टिव्हिटी; आणखी सहा शहरांची भर
सध्या विमानतळाच्या नेटवर्कमध्ये ४६ गंतव्यांचा समावेश झाला आहे. आगामी काळात उदयपूर, जोधपूर, रांची, दरभंगा, गुवाहाटी आणि सिंधुदुर्ग या सहा नव्या देशांतर्गत गंतव्यांची भर पडणार आहे. त्यामुळे नवी मुंबईहून थेट विमानप्रवासाच्या पर्यायांमध्ये आणखी मोठी वाढ होणार आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्गसारख्या कोकणातील महत्त्वाच्या पर्यटन जिल्ह्याशी हवाई जोडणी निर्माण होणे हे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
प्रवाशांच्या सेवेतही कार्यक्षमतेचा दावा
विमानतळाच्या वाढत्या प्रवासी संख्येसोबतच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांवरही भर देण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात ९४ टक्के विमानांमध्ये शेवटचे चेक-इन सामान ३० मिनिटांच्या आत बॅगेज कॅरोसेलवर पोहोचल्याचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने म्हटले आहे. जागतिक विमानतळांच्या कार्यक्षमतेच्या निकषांशी तुलना करता हा महत्त्वाचा सेवा निर्देशक मानला जात आहे.
प्रवासी विमानतळापासून कार्गो हबकडेही वाटचाल
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वाटचाल केवळ प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित राहणार नसून, विमानतळाला मोठे कार्गो हब म्हणून विकसित करण्याचेही नियोजन आहे. नुकतेच जगातील सर्वात मोठ्या मालवाहू विमानांपैकी एक असलेले Antonov An-124 अबुधाबीहून नवी मुंबई विमानतळावर दाखल झाले आणि सुमारे ४६ टन माल घेऊन आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतुकीच्या दृष्टीनेही विमानतळाची क्षमता अधोरेखित झाली आहे.
पहिल्या टप्प्यात २ कोटी, भविष्यात ९ कोटी प्रवासी क्षमता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता भविष्यातील मोठ्या हवाई वाहतुकीचा विचार करून विकसित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता सुमारे २ कोटी प्रवासी असून, पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यानंतर ती तब्बल ९ कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. कार्गो हाताळणीची क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे नियोजन आहे.
मुंबई महानगर प्रदेशाच्या हवाई वाहतुकीला नवा पर्याय
नवी मुंबई विमानतळाचा सर्वात मोठा फायदा मुंबई महानगर प्रदेशाच्या वाढत्या हवाई वाहतुकीला होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण कमी करण्यासाठी आणि एमएमआरला बहुविमानतळ प्रणाली देण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई–नवी मुंबई परिसरातील प्रवासी, उद्योग, पर्यटन आणि व्यापारासाठी या विमानतळाचे महत्त्व आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अवघ्या काही महिन्यांत ३० लाख प्रवासी, २२,५०० व्यावसायिक उड्डाणे, ४६ गंतव्यांशी जोडणी आणि आंतरराष्ट्रीय आकाशात प्रवेश, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ही वेगवान झेप केवळ एका विमानतळाच्या यशाची कहाणी नसून, नवी मुंबईला भारताच्या आणि पश्चिम भारताच्या भविष्यातील महत्त्वाच्या हवाई केंद्राच्या रूपात उभे करणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात ठरत आहे.