फडणवीस यांची घोषणा; वाशी एपीएमसीचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करणार
नवी मुंबई : माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपवला जाणार नाही, उलट तो अधिक मजबूत केला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर वडाळा येथील गृहप्रकल्पात सुमारे २८५० ते ३ हजार माथाडी कामगारांना हक्काची घरे देण्याची घोषणा त्यांनी केली. वाशी एपीएमसी मार्केट यार्डचाही पुढील ५० वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्याचे संकेत फडणवीस यांनी दिले.
स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त वाशी एपीएमसी आवारात आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात फडणवीस बोलत होते. माथाडी कायदा हा कामगारांचे ‘सुरक्षा कवच’ असल्याचे सांगत त्यांनी, या कायद्याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला. माथाडी चळवळीच्या नावावर कामगारांचे नुकसान करणाऱ्या अनधिकृत प्रवृत्तींवर कारवाई करण्यासाठी कामगार नेते व संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
३ हजार कामगारांना घरांचा दिलासा
वडाळा येथील माथाडी कामगारांच्या गृहप्रकल्पातील अडचणी दूर करून आवश्यक एफएसआय व परवानग्या देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे २८५० ते ३ हजार कामगारांना आधुनिक आणि हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भविष्यातही कामगारांसाठी आणखी गृहप्रकल्प उभारण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
एपीएमसीचा चेहरामोहरा बदलणार
सुमारे ५० वर्षांपूर्वी उभारलेल्या वाशी एपीएमसी मार्केटच्या इमारती आता जुन्या झाल्या असून, बदलत्या व्यापार पद्धती आणि वाढती उलाढाल लक्षात घेऊन संपूर्ण बाजारपेठेचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुनर्विकास केला जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले. यासाठी आवश्यक एफएसआय उपलब्ध करून देण्यात येईल. आधुनिक बाजारपेठेमुळे माथाडी कामगारांसाठी रोजगाराच्या संधीही वाढतील, असा दावा त्यांनी केला.
माथाडी मंडळांचे सक्षमीकरण
राज्यातील सर्व ३६ माथाडी मंडळांचे सक्षमीकरण व पुनर्रचना करण्यात येणार असून, त्यांच्या कामकाजाचे स्वतंत्र पॅनेलमार्फत लेखापरीक्षण केले जाईल. कामगारांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाईसारखे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
माथाडी कामगारांच्या पुढील पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देत डॉक्टर, इंजिनिअर, सीए, सीएस आणि सनदी अधिकारी घडावेत, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व ‘सारथी’च्या माध्यमातून योजनांची आखणी केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
या मेळाव्यास माजी मंत्री गणेश नाईक, पणन व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मनोज जामसुतकर, नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाता पाटील, डॉ. प्राची पाटील, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, विजय सावंत, एकनाथ जाधव, गुलाबराव जगताप, रविकांत पाटील, नगरसेविका ॲड. भारती पाटील, माजी नगरसेवक रतन मांडवे यांच्यासह माथाडी संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो कामगार उपस्थित होते.