नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ब्रेकडाऊन वाहनांची दुरुस्ती ज्या इमारतीत केली जाते, तीच इमारत धोकादायक अवस्थेत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी इमारतीची तातडीने स्ट्रक्चरल तपासणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी कामगार नेते तथा महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी केली आहे.
ब्रेकडाऊन झालेली वाहने दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी दररोज या इमारतीत काम करतात. मात्र, इमारतीची सध्याची अवस्था पाहता तिच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इमारतीचा काही भाग कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीविताशी संबंधित या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, अशी भूमिका सावंत यांनी घेतली आहे.
याबाबत रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन समितीला निवेदन देऊन इमारतीची तातडीने तांत्रिक व स्ट्रक्चरल तपासणी करण्याची मागणी केली आहे. इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यास तातडीने दुरुस्ती, पुनर्बांधणी किंवा सुरक्षित पर्यायी जागेची व्यवस्था करावी. तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी, संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
