मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
“अभिनयातील वादळ, रोखठोक बाणा आणि शेतकऱ्यांच्या हाकेला धावून जाणारा सहृदयी माणूस… ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे,” अशा शब्दांत नितेश राणे यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ असा गाजलेला प्रवास करणारा हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आता आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही, अशी भावना राणे यांनी व्यक्त केली. नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ठसा उमटवला होता.
अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नाना पाटेकर यांनी शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठीही काम केले. त्यांच्या जाण्याने झालेली हानी कधीही भरून निघणार नाही, असेही नितेश राणे यांनी म्हटले.
“नानांना विनम्र श्रद्धांजली! भावपूर्ण आदरांजली!” अशा शब्दांत नितेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.