नवी मुंबई जिल्हा कॉग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर आक्रमक
ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र उद्घाटनाविना
तुटलेली खेळणी, ओपन जीम आणि बाकड्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्तांकडे निवेदन
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ मधील नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यानातील विविध समस्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव सौ. विद्याताई भांडेकर यांनी उपस्थित केला आहे. उद्यानातील तुटलेली बाकडी, ओपन जीममधील नादुरुस्त साहित्य, लहान मुलांच्या खेळण्यांची दुरवस्था आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र या प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन दिले आहे.
नेरूळ सेक्टर ४ मधील सिडको वसाहतीत महापालिका शाळेजवळ असलेल्या या उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी काही वर्षांपूर्वी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले. मात्र, या केंद्राचे अद्याप लोकार्पण झाले नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नसल्याचे विद्याताई भांडेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. नागरिकांसाठी सुविधा उभारूनही त्यांचा प्रत्यक्ष वापर सुरू होत नसेल, तर त्याचा उपयोग काय, असा सवालही या प्रकरणातून उपस्थित होत आहे.
उद्यानातील ओपन जीममधील व्यायामाचे साहित्य आणि लहान मुलांची खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याचे, तसेच नागरिकांसाठी बसविण्यात आलेली बाकडीही नादुरुस्त झाल्याचे भांडेकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. उद्यानात व्यायामासाठी येणारे नागरिक, खेळण्यासाठी येणारी मुले आणि विश्रांतीसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक यांना या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्यांबाबत आपण सातत्याने महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करीत आहोत; मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप विद्याताई भांडेकर यांनी केला आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या सुविधांची योग्य देखभाल न झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
उद्यानातील बाकड्यांची दुरुस्ती, ओपन जीममधील साहित्याची दुरुस्ती अथवा आवश्यकतेनुसार नवीन साहित्य बसविणे आणि लहान मुलांची खेळणी सुस्थितीत आणणे, या कामांना तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी भांडेकर यांनी केली आहे. तसेच, कामांमध्ये निष्काळजीपणा झाल्याचे आढळल्यास संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि आवश्यक असल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारलेल्या विरंगुळा केंद्राचे लवकरात लवकर लोकार्पण करून ते नागरिकांच्या वापरासाठी खुले करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्तांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष
नेरूळ सेक्टर ४ मधील या उद्यानाचा प्रश्न केवळ दुरुस्तीपुरता मर्यादित नसून सार्वजनिक सुविधांची देखभाल आणि महापालिकेच्या कामांची जबाबदारी यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. कैलास शिंदे या निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश देतात का, तसेच उद्यानातील सर्व सुविधा सुस्थितीत आणून विरंगुळा केंद्र नागरिकांसाठी खुले होते का, याकडे स्थानिक रहिवाशांचे लक्ष लागले आहे.