‘बॉयलर इंडिया’च्या माध्यमातून उद्योगांना नवे व्यासपीठ : कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर
मुंबई : बॉयलर उद्योगातील सुरक्षितता, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योगस्नेही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, ‘बॉयलर इंडिया २०२६ च्या माध्यमातून या क्षेत्रातील उत्पादक, उद्योजक, तज्ज्ञ, अभियंते, ऑपरेटर आणि ग्राहकांना एकत्र आणून तंत्रज्ञान व ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देण्यात येत असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.
वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात कामगार विभाग बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘बॉयलर इंडिया २०२६’ कार्यशाळा, चर्चासत्र व प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती आय.ए. कुंदन, विकास आयुक्त (असंघटीत कामगार) सुशिल खोडवेकर, केंद्रीय बाष्पके मंडळाचे सचिव तथा तांत्रिक सल्लागार (बाष्पके) संदीप कुंभार, बाष्पके संचालनालयाचे संचालक संदीप चिवटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर म्हणाले, ऊर्जा निर्मिती, साखर उद्योग, वस्त्रोद्योग, रसायने, पेट्रोकेमिकल्स, अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती, कागद उद्योग,रिफायनरीज यांसह विविध उद्योगांमध्ये बॉयलर हा उत्पादन प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे बॉयलरची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता यांचा थेट संबंध उद्योगाची उत्पादकता, कामगारांची सुरक्षितता, ऊर्जेचा कार्यक्षम वापर, पर्यावरण आणि देशाच्या औद्योगिक स्पर्धात्मकतेशी असल्याचे ते म्हणाले.
शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स आणि नागरिक केंद्री सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. या उपक्रमात बॉयलर संचालनालयाने राज्यातील ६८ विभागांमध्ये चौथा क्रमांक प्राप्त केला, याबद्दल त्यांनी संचालनालयाचे अभिनंदन केले. बॉयलर क्षेत्रातील तपासणी, मान्यता, लेखापरीक्षण आदी प्रक्रियांमध्ये अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही आता भविष्यातील बाब राहिलेली नसून आजच्या उद्योगाची गरज बनली आहे. बॉयलर क्षेत्रात बिघाड झाल्यानंतर सूचना देण्याऐवजी बिघाड होण्याची शक्यता आधीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील का, यावर तज्ज्ञांनी आणि उद्योग क्षेत्राने गांभीर्याने विचार करावा. ‘बॉयलर इंडिया २०२६’च्या माध्यमातून अशा आधुनिक तंत्रज्ञानावर, नव्या संकल्पनांवर आणि औद्योगिक सुरक्षिततेवरील उपायांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बॉयलर उद्योगाच्या भविष्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. उच्च दाब वेल्डिंग, बॉयलर निर्मिती, तपासणी, विनाशरहित चाचणी, देखभाल, स्वयंचलन आणि प्रगत बॉयलर संचालन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी नागपूर येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत असून, त्याचे रूपांतर बॉयलर कौशल्य, वेल्डिंग, तपासणी आणि औद्योगिक सुरक्षिततेसाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रमाणपत्रासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
बॉयलर क्षेत्रात उच्च दाब, उच्च तापमान आणि गुंतागुंतीच्या औद्योगिक प्रक्रिया यांचा समावेश असल्याने सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. कामगारांमुळे उद्योग उभे आहेत आणि उद्योगांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास साधला जात आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षितता ही उद्योगांची मूलभूत जबाबदारी आहे. ‘सेफ्टी फर्स्ट’ ही केवळ घोषणा न राहता ती प्रत्येक उद्योगातील प्रत्यक्ष कार्यपद्धती झाली पाहिजे.
बॉयलर इंडिया २०२६च्या माध्यमातून सहभागी उद्योजक, उत्पादक, अभियंते, तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानासोबत नवीन कौशल्य आत्मसात करून ते उद्योगाच्या सुरक्षितता आणि उत्पादकतेसाठी वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.
00 000
बॉयलर निर्मितीपासून तपासणीपर्यंत ‘सेफ्टी फर्स्ट’ आवश्यक – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, बॉयलर निर्मितीमध्ये प्लेट रोलिंग, डिसिंग, ट्यूब शीट, ट्यूब्स, वेल्डिंग, विविध चाचण्या, हायड्रो टेस्टिंग आणि शेल टेस्टिंग अशा अनेक प्रक्रिया असतात. या प्रत्येक प्रक्रियेत निर्धारित तांत्रिक मानके आणि सुरक्षितता निकषांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. ‘बॉयलर इंडिया’मुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणता येत असून, या प्रदर्शनातून उद्योग क्षेत्राला व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती कुंदन यांनी ‘बॉयलर इंडिया २०२६’च्या आयोजनाचे कौतुक करत बॉयलर हे औद्योगिक क्षेत्राचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून त्याबाबत अधिक व्यापक जनजागृती आणि माहितीची देवाणघेवाण आवश्यक आहे, असे सांगितले. ‘बॉयलर इंडिया’चे हे चौथे आयोजन असून यंदाच्या प्रदर्शनात देश-विदेशातील सुमारे २४६ प्रदर्शकांनी सहभाग घेतला आहे. बॉयलरची भूमिका केवळ उष्णता निर्मितीपुरती मर्यादित राहिलेली नसून ऊर्जा कार्यक्षमता, कार्बन उत्सर्जनात घट आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापरातही बॉयलर महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
संदीप कुंभार यांनी बॉयलर क्षेत्रातील केंद्र शासनाच्या सुधारणा आणि नव्या नियामक व्यवस्थेची माहिती देत उत्पादक, वापरकर्ते, दुरुस्तीदार, फॅब्रिकेटर्स आणि अभियंते यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी, यासाठी ‘बॉयलर इंडिया’हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत असल्याचे ते म्हणाले.
000
प्रदर्शनातील स्टॉलची पाहणी
यावेळी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध उत्पादकांनी मांडलेले बॉयलर, आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञान व सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेतली तसेच संबंधित प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी बॉयलरच्या विविध तंत्रज्ञानावर प्रकाश टाकणारा लघुचित्रपट दाखविण्यात आला. प्रदर्शनात विविध प्रकारचे बॉयलर, आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा उपकरणे आणि संबंधित सेवांची माहिती देण्यात आली. बॉयलर क्षेत्रातील तंत्रज्ञान, सुरक्षितता, नियम व कार्यपद्धती याबाबतच्या माहितीपूर्ण पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्तावित बाष्पके संचालनालयाचे संचालक संदीप चिवटे यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसंचालक ए.एम झुंजुरे यांनी केले. यावेळी विविध राज्यांतील अधिकारी, बॉयलर क्षेत्रातील तज्ज्ञ, अभियंते, उत्पादक, औद्योगिक प्रतिनिधी,ऑपरेटर आणि प्रदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
