निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक
हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचा दावा, तरुणाई आणि महिलांचा सहभाग
श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून राजकीय रणशिंग फुंकले. ‘ज्ञानेश कुमार, राजीनामा द्या!’ या मागणीने वाशी परिसर दणाणून सोडत मनसेने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधातील आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. या मोहिमेला नागरिक, महिला आणि विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याचा दावा मनसेने केला.
मनसेचे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत स्वाक्षरी करून नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली. ‘वन, टू, थ्री, फोर… ज्ञानेश कुमार व्होट चोर’, ‘ज्ञानेश कुमार यांचे करायचे काय? खाली डोकं, वर पाय!’ आणि ‘गद्दार ज्ञानेश, राजीनामा द्या!’ अशा घोषणांनी परिसरात राजकीय वातावरण तापले. तिरंगा ध्वज हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी ‘इन्कलाब झिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणाही दिल्या. ‘गद्दार ज्ञानेश, राजीनामा द्या’ असा संदेश असलेले टी-शर्ट परिधान केलेले कार्यकर्ते या आंदोलनाचे लक्षवेधी ठरले.
निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास आणि निवडणूक आयोगाच्या कारभारातील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत मनसेने या मोहिमेला आक्रमक राजकीय स्वरूप दिले. स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेल्या काही नागरिकांनी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
मुंबईत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर नवी मुंबईतही मनसेने रस्त्यावर उतरून आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यामुळे वाशीतील ही मोहीम केवळ स्वाक्षरी संकलनापुरती मर्यादित न राहता निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधातील राजकीय विरोधाचे व्यासपीठ ठरली.
प्रत्येक विभागात आंदोलनाची धग पोहोचवणार!
वाशीतील मोहिमेला मिळालेल्या प्रतिसादानंतर नवी मुंबईच्या प्रत्येक विभागात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला. नागरिकांच्या सहभागातून हा मुद्दा व्यापक स्तरावर मांडण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात या आंदोलनाची व्याप्ती कितपत वाढते आणि राजकीय पातळीवर त्याचे काय पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागले आहे.