युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवेंचे पालिकेला निवेदन
सेक्टर २, ८ आणि १० मधील कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी
नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २, ८ आणि १० परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत युवा सेना, नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस निखिल रतन मांडवे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
नेरुळ येथील जलकुंभावर माजी नगरसेवक रतन मांडवे यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कार्यकाळात पाणीपुरवठा वाढविण्यासाठी पाच पंप बसविण्यात आले होते. मात्र, तरीही संबंधित परिसरातील पाणीटंचाईची समस्या कायम असल्याचे निखिल मांडवे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
पाच पंप कार्यान्वित आहेत का?
पाणीपुरवठा सुधारण्यासाठी पाच पंप बसविण्यात आले असतानाही नागरिकांना कमी दाबाने पाणी का मिळत आहे? हे पंप प्रत्यक्षात कार्यान्वित आहेत का? कार्यान्वित असल्यास पाणीटंचाई निर्माण होण्यामागचे नेमके कारण काय? असे सवाल उपस्थित करत महापालिका प्रशासनाने याबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी निखिल मांडवे यांनी केली आहे.
सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील घरांपर्यंतही पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जलवाहिन्यांच्या वॉलची स्वच्छता करण्याची मागणी
पावसाळा संपल्यानंतर देखभाल व दुरुस्तीच्या कामांतर्गत परिसरातील जलवाहिन्यांचे वॉल तातडीने स्वच्छ करून घ्यावेत, जेणेकरून पाण्याचा दाब वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळू शकेल, अशी सूचना मांडवे यांनी केली आहे.
नेरुळ सेक्टर २, ८ आणि १० मधील पाणीटंचाईच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत आणि नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निखिल रतन मांडवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.