जीवन गव्हाणे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत शहरातील शाळांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत क्रीडाप्रेमींची मने जिंकली. १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुली अशा सहा गटांत झालेल्या या स्पर्धेत एकूण १०४ संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल, नेरूळ, क्राईस्ट अकॅडमी, कोपरखैरणे आणि फा. ॲग्नल स्कूल, वाशी यांच्या संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. २००९-१० पासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील स्पर्धा कोपरखैरणे सेक्टर २३ येथील क्राईस्ट अकॅडमी स्कूलच्या बास्केटबॉल कोर्टवर पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन महानगरपालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे उपसभापती राजू मढवी यांच्या हस्ते झाले. यावेळी समिती सदस्य दीक्षा कचरे, ऐश्वर्या सोनवणे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आणि शाळेचे विश्वस्त फा. जेसन उपस्थित होते. स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
डॉन बॉस्कोचे दुहेरी यश
१४ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात डॉन बॉस्को सिनियर सेकंडरी स्कूल, नेरूळने फा. ॲग्नल स्कूल, वाशीवर ६-४ अशी मात करीत विजेतेपद पटकावले. याच वयोगटातील मुलींच्या अंतिम सामन्यात डॉन बॉस्कोने विबग्योर स्कूल, ऐरोलीचा १३-८ असा पराभव केला. दोन्ही गटांत विजेतेपद मिळवत डॉन बॉस्कोने आपले वर्चस्व सिद्ध केले.
क्राईस्ट अकॅडमीची १७ वर्षांखालील मुलांच्या गटात बाजी
१७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात क्राईस्ट अकॅडमी, कोपरखैरणेने डॉन बॉस्को, नेरूळवर २८-१० असा विजय मिळवला. या गटात क्राईस्ट अकॅडमीने प्रभावी खेळाच्या जोरावर अजिंक्यपद पटकावले. मुलींच्या गटात दिल्ली पब्लिक स्कूल, नेरूळने टिळक पब्लिक स्कूल, नेरूळचा १३-९ असा पराभव करीत विजेतेपद मिळवले.
फा. ॲग्नल स्कूलचे दोन्ही गटांत यश
१९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात फा. ॲग्नल स्कूल, वाशीने क्राईस्ट अकॅडमी, कोपरखैरणेवर ३५-२० अशी मात केली. मुलींच्या अंतिम लढतीत फा. ॲग्नल ज्युनिअर कॉलेज, वाशीने डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, नेरूळचा २०-९ असा पराभव केला. त्यामुळे फा. ॲग्नलच्या दोन्ही संघांनी विजेतेपदावर नाव कोरले.
मुंबई विभागीय स्पर्धेसाठी विजेत्यांची निवड
या स्पर्धेतील सहाही गटांतील विजेते संघ आता मुंबई विभागीय स्तरावरील स्पर्धेत नवी मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहेत. खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश म्हात्रे आणि उपसभापती राजू मढवी यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्राईस्ट अकॅडमीने सुसज्ज बास्केटबॉल कोर्ट उपलब्ध करून दिले. महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे आणि क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांच्या नियंत्रणाखाली स्पर्धा पार पडल्या. आयोजनासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक आणि मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य लाभले.