वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार कुटुंबीयांशी संवाद; अडचणी जाणून घेत शासनाच्या पाठबळाचा दिला विश्वास
वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता संकटाचा सामना करणाऱ्या मच्छीमार कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यंदाची दिवाळी वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार त्यांनी कोळीवाड्यातील कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची आपुलकीने विचारपूस केली. त्यांच्या समस्या जाणून घेत राज्य सरकार प्रत्येक संकटात मच्छीमारांच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास दिला.
अपुऱ्या पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचे चटके शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांनाही बसत आहेत. व्यवसायातील अडचणी आणि आर्थिक संकटामुळे अनेक मच्छीमार कुटुंबांसमोर आव्हाने उभी राहिली आहेत. ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्याला भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी शकुंतला तोंबरी आणि विजय तुका यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांशी संवाद साधला. मच्छीमारी व्यवसायातील अडचणी, दैनंदिन प्रश्न आणि आर्थिक परिस्थितीचा कुटुंबांवर होणारा परिणाम जाणून घेतला. दिवाळीच्या या भेटीत त्यांनी मच्छीमार कुटुंबीयांना फराळाचे वाटप करून त्यांच्यासोबत सणाचा आनंदही वाटून घेतला.
‘मच्छीमार बांधवांनी एकटे पडू नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे,’ असा विश्वास देत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करेल, असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सणासुदीच्या आनंदात मच्छीमार कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेत, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संदेश मंत्री नितेश राणे यांच्या या दिवाळी भेटीतून देण्यात आला.