मराठवाड्याच्या घशाला कोरड; नोव्हेंबरमध्येच पाण्यासाठी वणवण!
९३१ प्रकल्पांमध्ये अवघा ३७.५८ टक्केच पाणीसाठा
स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
छत्रपती संभाजीनगर : पावसाळा संपून जेमतेम दीड महिना झाला असताना मराठवाड्यात पाण्याची चिंता आतापासूनच गडद होऊ लागली आहे. ज्या काळात धरणांमधील पाणीसाठ्याच्या जोरावर पुढील उन्हाळ्याचे नियोजन व्हायला हवे, त्याच काळात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. विहिरींची पातळी खालावली, लहान धरणांनी तळ गाठला आणि शेतातील ओलही आटू लागली आहे. पावसाने ओढ दिल्याचा फटका आता केवळ शेतीला नाही, तर गावागावांतील रोजच्या जगण्याला बसू लागला आहे.
जलसंपदा विभागाच्या १० नोव्हेंबरच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील ९३१ मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सुमारे ३८.१६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच काळात हा साठा ८८.९५ टक्के होता. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. मोठ्या धरणांमध्ये ५२.६८ टक्के पाणी असले, तरी ८१ मध्यम प्रकल्पांत केवळ १७.५१ टक्के, तर ८०६ लघु प्रकल्पांत अवघा १३.२१ टक्के साठा आहे. या आकडेवारीतून मोठ्या धरणांपेक्षा स्थानिक जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या गावांसमोरील संकट अधिक स्पष्ट होते.
मोठ्या धरणांत पाणी; पण गावांची तहान कायम!
जायकवाडी धरणात सुमारे ७० टक्के पाणीसाठा असला, तरी मराठवाड्यातील सर्व भागांना त्याचा थेट लाभ मिळत नाही. माजलगाव धरणात सुमारे २० टक्के, मांजरा धरणात अवघा ५ टक्के, सिद्धेश्वरमध्ये १५ ते १६ टक्के, निम्न दुधनामध्ये १२ टक्के, तर निम्न तेरणा आणि निम्न मनारमध्ये १८ टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांतील पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी राखून ठेवण्याचे नियोजन करावे लागत असताना मध्यम व लघु प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांची चिंता वाढली आहे.
टँकरची चाहूल; उन्हाळ्यापूर्वीच संकट
पाणीटंचाईचे गांभीर्य यापूर्वीच दिसू लागले आहे. सप्टेंबरच्या अखेरीस मराठवाड्यातील १४२ गावे आणि ९१ वाड्यांना पाणीपुरवठ्यासाठी २४६ टँकर सुरू होते, तर ५१२ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला टँकरची संख्या आणखी वाढल्याची नोंद झाली. नोव्हेंबरमध्येच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही भागांत टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे वृत्त आहे.
बीड जिल्ह्यातील परिस्थिती तर अधिक चिंताजनक आहे. ५ नोव्हेंबरच्या आढावा बैठकीत सादर झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १६४ सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ १२.०१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यातील ५१ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले होते. भूजल पातळीतही ४.५५ मीटरने घट झाल्याची नोंद आहे.
शेतात पाणी नाही; रब्बीच्या आशेवरही पाणी
पाण्याअभावी रब्बी हंगामाचे गणितही बिघडत आहे. जमिनीत पुरेशी ओल नसल्याने गहू, हरभरा यांसारखी पिके घेणे कठीण बनले आहे. पेरणी झाली तरी पिकांना पुढील काळात पाणी मिळेल का, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. विहिरींनी तळ गाठल्याने सिंचनाची साधने असूनही त्यांचा उपयोग होत नाही. पिके वाचविण्यासाठी टँकरने पाणी आणण्याचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी यंदाचा रब्बी हंगाम आर्थिकदृष्ट्याही कसोटीचा ठरण्याची शक्यता आहे.
जायकवाडीतून आवर्तन; पिण्याच्या पाण्याचे नियोजन महत्त्वाचे
रब्बी हंगामासाठी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात १० नोव्हेंबरपासून ३०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कालव्यांच्या साफसफाईमुळे नियोजित वेळापत्रकात बदल झाला. रब्बी हंगामात तीन आणि उन्हाळी हंगामात एक आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. मात्र, सिंचनासाठी पाणी सोडताना पिण्याच्या पाण्याची गरज, धरणातील उपलब्ध साठा आणि पुढील पावसाळ्यापर्यंतचा कालावधी यांचा समतोल राखणे अत्यावश्यक ठरणार आहे.
पुढील सहा महिने कसोटीचे!
नोव्हेंबरमध्येच पाण्याची टंचाई जाणवू लागली असेल, तर जानेवारीनंतर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे. मार्च-एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोतांवरचा ताण वाढणार आहे. गावोगावी टँकरच्या फेऱ्या, पाण्यासाठी होणारी प्रतीक्षा, महिलांची पायपीट, जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पाण्याचीही चिंता आणि शेतीच्या उत्पन्नावर आलेले संकट, असे चित्र उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न आता केवळ पावसाच्या प्रतीक्षेपुरता मर्यादित राहिलेला नाही. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य, गळती रोखणे, टँकरचे पारदर्शक नियोजन, विहिरींचे पुनर्भरण आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. अन्यथा, उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक गावांमध्ये पाण्यासाठी संघर्षाची वेळ येऊ शकते.