२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, जवान व निरपराध नागरिकांना श्रद्धांजली
नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
नवी मुंबई : संविधान दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर सुजाताताई पाटील यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे महापौरांसमवेत सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे, मुख्य लेखा परीक्षक राजेंद्र गाडे, उपआयुक्त सुखदेव येडवे, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, शिक्षणाधिकारी अशोक कडुस व इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्विकृत करुन २६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्त्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत संविधान महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्या अनुषंगाने आज संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे महापौर सुजाताताई पाटील यांचे समवेत अधिकारी, कर्मचारीवृंदाने सामुहिक वाचन केले.
यावेळी २६ /११/ २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, भारतीय सैन्यदलातील जवान, निरपराध नागरिक यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या शाळांमध्येही संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले, तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षापासून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘घरोघरी संविधान’ उपक्रम सर्वत्र उत्साहात राबविण्यात येत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.



