गणेश नाईक, संदीप नाईक यांच्यानंतर सागर नाईक यांचा ऐरोलीत जनतेशी थेट संवाद
नाईक परिवाराची संपर्क मोहीम विरोधकांसाठी धोक्याची घंटा?
नवी मुंबई : जनतेशी थेट संपर्क, नागरिकांच्या तक्रारींची दखल आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा, हे राजकारणातील प्रभावी सूत्र मानले जाते. याच सूत्रावर आता नाईक परिवाराने नवी मुंबईत आपली संपर्क मोहीम अधिक व्यापक करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार, माजी आमदार संदीप नाईक यांचा नियमित जनसंवाद आणि आता माजी महापौर तथा नवी मुंबई महापालिकेतील सभागृह नेते सागर नाईक यांचा ऐरोलीतील जनसंवाद, अशा माध्यमातून नाईक परिवार पुन्हा एकदा थेट जनतेच्या प्रश्नांमध्ये सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
वनमंत्री गणेश नाईक हे जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध शासकीय, प्रशासकीय आणि नागरी समस्या जाणून घेत आहेत. १९ नोव्हेंबर रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या जनता दरबारात ४०० हून अधिक निवेदने प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या प्रश्नांवर कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले. यापूर्वीच्या जनता दरबारांनाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
दुसरीकडे, माजी आमदार संदीप नाईक यांनी बेलापूर येथील जनसंपर्क कार्यालयातून नियमित जनसंवाद सुरू ठेवला आहे. नागरिकांच्या नागरी सुविधा, शैक्षणिक समस्या, रोजगार आणि प्रशासकीय अडचणी जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्यावर त्यांचा भर आहे. केवळ निवेदने स्वीकारण्यापेक्षा समस्यांच्या निराकरणासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या जनसंवादातही नागरिकांच्या विविध प्रश्नांची दखल घेण्यात आली.
आता सागर नाईक यांची ऐरोलीत एन्ट्री!
या संपर्क मोहिमेत आता सागर नाईक यांनीही पुढाकार घेतला आहे. ऐरोली येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेण्यासाठी थेट संवाद सुरू केला आहे. २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्याच जनसंवादाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. वैयक्तिक अडचणी, स्थानिक नागरी समस्या आणि मूलभूत सुविधांशी संबंधित तक्रारी नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडल्या. काही प्रश्नांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधण्यात आला, तर उर्वरित प्रश्नांचा प्राधान्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
विशेष म्हणजे, सागर नाईक यांनी दर मंगळवारी ऐरोलीतील या कार्यालयात नागरिक, कार्यकर्ते आणि गरजू व्यक्तींना भेटण्यासाठी उपलब्ध राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ऐरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी स्थानिक पातळीवर आणखी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
ऐरोलीतील पिछेहाटीनंतर नाईक परिवाराची सावध पावले?
नाईक परिवाराच्या या वाढत्या जनसंपर्क मोहिमेला २०२६ मधील नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाची पार्श्वभूमीही आहे. महापालिकेत भाजपने १११ पैकी ६५ जागा जिंकून सत्ता मिळविली असली, तरी ऐरोली विधानसभा क्षेत्रात पक्षाला अपेक्षित वर्चस्व राखता आले नाही. या क्षेत्रात भाजपचे ३०, तर शिंदे यांच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले. विशेषतः दिघा-ऐरोली पट्ट्यात शिवसेनेने मिळविलेल्या यशामुळे भाजपच्या स्थानिक राजकीय समीकरणांना धक्का बसला. दिघा-ऐरोली पट्ट्यातील २० जागांपैकी भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागल्याचे निवडणूक विश्लेषणातून समोर आले होते.
वनमंत्री गणेश नाईक यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ऐरोलीत विरोधकांनी मिळविलेले हे यश भाजपसाठी निश्चितच आत्मपरीक्षणाचा विषय ठरले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर केवळ राजकीय बैठका आणि पक्षीय कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांमध्ये प्रत्यक्ष सहभाग वाढविण्याची रणनीती नाईक परिवाराने स्वीकारली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नाईक परिवाराची एकत्रित संपर्क रणनीती विरोधकांसाठी आव्हान?
गणेश नाईक यांचा राज्यस्तरीय प्रशासकीय अनुभव आणि राजकीय प्रभाव, संदीप नाईक यांचा जनसंपर्क व संघटनात्मक अनुभव आणि सागर नाईक यांचा महापालिका प्रशासनातील सहभाग, अशा तीन स्तरांवर नाईक परिवाराने नागरिकांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील नागरिकांच्या प्रश्नांपर्यंत पोहोचण्याची त्यांची क्षमता वाढू शकते.
विशेषतः ऐरोलीमध्ये सागर नाईक यांनी नियमित जनसंवाद सुरू केल्याने स्थानिक पातळीवर पक्ष संघटना आणि नागरिकांमधील संपर्क मजबूत करण्याचा प्रयत्न दिसतो. महापालिका निवडणुकीतील पिछेहाटीनंतर नाईक परिवाराने जनतेशी संपर्क वाढविण्यावर दिलेला भर विरोधकांसाठी भविष्यातील राजकीय आव्हान ठरू शकतो.
मात्र, या संपर्क मोहिमेचे खरे यश केवळ नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यात नसून त्या प्रत्यक्ष किती सोडवल्या जातात, यावर ठरणार आहे. ऐरोलीतील जनतेच्या प्रश्नांना सातत्याने न्याय मिळाला, तर नाईक परिवाराला गमावलेला राजकीय प्रभाव पुन्हा मजबूत करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आता नाईक परिवाराच्या या नव्या जनसंपर्क मोहिमेकडे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.