२१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान मोफत शस्त्रक्रिया
पात्र लाभार्थ्यांना १,४५१ रुपयांचे प्रोत्साहन अनुदान
नवी मुंबई : कुटुंब नियोजनाची जबाबदारी केवळ महिलांची नसून पती-पत्नी दोघांचीही समान आहे. कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढविण्यासह पुरुष नसबंदीबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडा राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये जनजागृती व वैयक्तिक समुपदेशन केले जात आहे. तसेच सार्वजनिक रुग्णालय वाशी, ऐरोली, नेरूळ आणि माता-बाल रुग्णालय बेलापूर येथे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुरुष नसबंदी ही आधुनिक, सुरक्षित आणि प्रभावी कुटुंब नियोजन पद्धत आहे. या शस्त्रक्रियेमध्ये मोठा छेद न घेता छोट्या छिद्राद्वारे प्रक्रिया केली जाते. त्यामुळे शस्त्रक्रिया कमी वेळेत पूर्ण होते आणि लाभार्थ्यांना लवकरच दैनंदिन कामकाज सुरू करता येते. या प्रक्रियेमुळे पुरुषत्व, लैंगिक क्षमता किंवा शारीरिक ताकदीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
या पंधरवड्यात पात्र लाभार्थ्यांसाठी शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेपूर्वी वैद्यकीय तपासणी व समुपदेशन, तसेच शस्त्रक्रियेनंतर आवश्यक देखभाल आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनही केले जाणार आहे. विशेष म्हणजे, पुरुष नसबंदी करून घेणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शासनाच्या नियमानुसार १,४५१ रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.
आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेविकांच्या माध्यमातून पात्र दाम्पत्यांशी संवाद साधून दोन अपत्यांनंतर कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पुरुषांनीही कुटुंब नियोजनाच्या निर्णयात पुढाकार घेऊन महिलांवरील गर्भनिरोधक पद्धतींचा भार कमी करण्यासाठी सहभाग नोंदवावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
पुरुष नसबंदीबाबत असलेल्या गैरसमजांना बळी न पडता पात्र पुरुषांनी या सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीचा स्वीकार करावा. यासाठी नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राशी संपर्क साधून मोफत शस्त्रक्रिया, समुपदेशन आणि प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.