* कार्यकर्ता-पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
* इफ्तार पार्टीचेदेखील आयोजन
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : लोकसभा निवडणूकीनंतर नवी मुंबई कार्यक्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अस्तित्वासाठी संघर्ष करत असून पदाधिकार्यांची भांडणे, मारामार्या, होर्डींगची फाडाफाडी यामुळे नवी मुंबईकरांमध्ये दिवसेंगणिक मनसेची प्रतिमा मलीन होवू लागली आहे. दुसरीकडे मनसे जनहित कक्षाचे नवी मुंबई शहर अध्यक्ष हाजी शाहनवाझ खान आपल्या सेलच्या माध्यमातून मनसे पक्षसंघटना जनताभिमुख करण्यासाठी रात्रीचा दिवस करत असून जनाधार वाढविण्यासाठी परिश्रम घेत आहे. मनसे जनहित कक्ष, नवी मुंबईच्या वतीने १६ जुलै रोजी कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वाशी, सेक्टर ११मधील काली माता मंदीर, आयसीआयसीआय बँकेसमोरील सामान्य सेंटरमध्ये हॉलमध्ये दिवसभर हा कार्यक्रम चालणार असून याच कार्यक्रमात मनसे जनहितच्या वतीने इफ्तार पार्टीचेही आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबईत पक्षसंघटना तळागाळात विस्तारण्यासाठी व नवी मुंबईकरांचा विश्वास पुन्हा प्राप्त करण्यासाठी मनसे जनहितच्या वतीने १६ जुलैपासून आठवडाभर ‘मनसे जनहित आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी सांगितले. मनसेतील गटबाजी व देण्याघेण्याच्या व्यवहारावरून चव्हाट्यावर आलेली भांडणे आणि दुसरीकडे जनहितचे पक्षाला उपयुक्त कार्यक्रम यामुळे पक्षीय पातळीवर हाजी शाहनवाझ खान यांचा दबदबा वाढीस लागला आहे. मनसे स्थापनेपासून हाजी शाहनवाझ खान कार्यरत असून मुस्लिम वर्गाचा जनाधार वळवित असून आगामी विधानसभा निवडणूकीत बेलापूर विधानसभा निवडणूकीत मनसेचे संभाव्य उमेदवार म्हणून हाजी शाहनवाझ खान हे चर्चेत आहेत.