मनसेचे विभाग अध्यक्ष सुनिल पाटील यांचा आरोप
नवी मुंबई – नालेसफाईच्या नावाखाली नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने लाखो रुपयांचा डल्ला मारल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुर्भे विभाग अध्यक्ष सुनिल पाटील यांच्याकडून उघडपणे करण्यात आला आहे.तसेच महानगर पालिका प्रशासनाने तात्काळ नाल्यांची योग्य रीतीने साफ सफाई करण्याची मागणी मनसे विभाग अध्यक्ष सुनिल पाटील यांनी केली आहे.
२६ जुलै च्या महाप्रलयी पावसानंतर नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नवी मुंबईतील सर्व छोट्या-मोठ्या नाल्यांची आणि गटारांची साफसफाई योग्य रीतीने केली जाते.नवी मुंबईतील जवळ जवळ सर्वच नाल्यांची आणि गटारांची साफसफाई योग्य रीतीने केली असल्याचा दावा महानगर पालिका प्रश्सानाकडून केला जात असला तरी पालिका प्रशासनाचा हा दावा फोल ठरला आहे.तुर्भे सेक्टर १९,२० एपीएमसी मार्केटमधील फळ मार्केटच्या बाजूच्या नैसर्गिक नाल्याचे विदारक चित्र आजही पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरल्याचे उत्तम उदारण आहे.ऑक्टोंबर २०१३ साली तुर्भे सेक्टर १९ आणि २० च्या नैसर्गिक नाल्याच्या साफसफाईसाठी महानगर पालिका प्रशासनाकडून ३,२८,८४२ रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते.परंतु,प्रत्यक्षात या नैसर्गिक नाल्याची महानगर पालिका प्रश्सानाकडून योग्यरीतीने साफसफाई झाली नसल्याचा आरोप मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष सुनिल पाटील यांनी उघडपणे केला आहे.हा विषय मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष सुनिल पाटील यांनी मनसेने मागे पालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये विभागअधिकार्यांच्या समोर देखील मांडला होता.तसेच २०१४ साली पावसाळ्यापूर्वीसुद्धा या नाल्याच्या साफसफाईसाठी महानगर पालिका प्रशासनाकडून साडेचार लाख रुपये खर्च करूनही नाला दुषित पाण्यामुळे,कचर्यामुळे काळवंडला आहे.तसेच नाल्यात अद्यापही गाळ कायम असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे भविष्यात २६ जुलैच्या महाप्रलयी पावसाची घटना पुन्हा घडल्यास नाल्यातील पाण्याची पातळी वाढून नाल्यातील पाणी पुन्हा रस्त्यावर येण्याची भीती मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष सुनिल पाटील यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे.महानगर पालिकेच्या उदासीनतेमुळे या नाल्याला बकालपणाचे स्वरूप आले असून आजूबाजूच्या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच या नाल्याच्या साफसफाईसाठी महानगर पालिका प्रशासनाने लाखो रुपये कशाप्रकारे खर्च केले हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे.