माजी खासदार संजीव गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- नरेंद्र मोदी सरकारचा रेल्वे अर्थसंकल्प हा जनतेची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प आहे. जनतेच्या खिशातून पैसे काढून स्वतःची खळगी भरणारा सरकारचा हा अर्थसंकल्प असल्याची टीका ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजीव नाईक यांनी या बजेटवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना केली आहे.
अच्छे दिन आनेवाले है, असे सांगत बुरे दिन या सरकारने आणले असून जनतेचा विश्वासघात केल्याचे ते म्हणाले. रेल्वेच्या इतिहासात आत्तापर्यंत १४.२ टक्के भाडेवाढ कोणत्याही सरकारने केली नव्हती ती मोदी सरकारने केली आहे. थेट परदेशी गुंतवणूक आणण्याचे सुतोवाच करुन खाजगीकरणाच्या माध्यमातून मोदी सरकारने देश विकण्यास काढला आहे, असा घणाघात डॉ.नाईक यांनी केला आहे. खाजगीकरणामुळे रेल्वेच्या सुविधा घेण्यासाठी आता प्रवाशांना पैसे मोजावे लागणार आहेत. ठाणे आणि नवी मुंबईसाठी या अर्थसंकल्पात काहीच ठोस नाही. खैरणे-बोनकोडे आणि दिघा ही दोन नवीन रेल्वे स्थानके नवी मुंबईसाठी मंजूर करुन घेतली होती. या दोन रेल्वे स्थानकांचा या बजेटमध्ये उल्लेख नाही. उरण-पनवेल आणि सीवूड- पनवेल या रेल्वे मार्गांचा उल्लेख नाही. नवी मुंबईतील वाशी खाडीपुलावरील सरचार्ज कमी करण्याचा उल्लेख नाही. १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या करण्याविषयी तरतूद नाही. डिझेलवरील अधिभार कायम आहे.
मुंबईसाठी एसी ट्रेन चाचणी करुन तयार आहेत. त्याला गती देण्यात आलेली नाही. एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे ‘खोदा पहाड, निकला चूहा’ असा आहे. जनतेने मोदी सरकारला भरभरुन मतदान केले. त्याची परतफेड या सरकारने जनतेवर महागाई लादून केल्याचा टोला संजीव नाईक यांनी लगावला आहे.
मुंबई आणि उपनगराच्या तोंडाला या अर्थसंकल्पाने पाने पुसली आहेत. याकडेे लक्ष वेधण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ घेणार असल्याची माहिती संजीव नाईक यांनी दिली.