संदीप नाईक यांचे जनतेेला आवाहन
नवी मुंबई : आमदार म्हणून तसेच नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न सोडविले असून मतदारसंघात भरघोस विकास कामे केली आहेत. मतदारसंघाच्या यापुढील विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मत द्या, दहशत माजविणार्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवा उमेदवार संदीप नाईक यांनी केले आहे.
युवा उमेदवार नाईक यांची प्रचारफेरी गुरुवारी (ता.९) ऐरोली वॉर्ड क्रमांक १०, वॉर्ड क्र. ११, वॉर्ड क्र. १२, वॉर्ड क्र.१३ आणि वॉर्ड क्रमांक १७ या विभागांमध्ये काढण्यात आली. यावेळी त्यांचे महिलावर्गाने औक्षण करुन स्वागत केले. विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
आमदार म्हणून जनतेने टाकलेला विश्वास संदीप नाईक यांनी सार्थ ठरविला आहे. पाच वर्षे ते सतत जनतेच्या संपर्कात राहिले. विधानसभेच्या कामकाजात १०० टक्के भाग घेऊन जनतेचे प्रश्न सोडविले. नाटयगृह, अम्युजमेंट पार्क, ईको जॉगिंग पार्क असे वैशिष्टयपूर्ण प्रकल्प त्यांच्या प्रयत्नाने उभे राहत आहेत. गवळीदेव, बामनदेव निसर्गस्थळांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार आहे. रस्ते, पदपथ, स्कायवॉक, उड्डाणपूल, उद्यानांचा मैदानांचा विकास, सुविधायुक्त परिवहन सेवा अशा अनेक सुविधा निर्माण झाल्या.संदीप नाईक यांनी मतदारसंघाचा समतोल विकास साधला त्यामुळे आमचे मत त्यांनाच असेल, अशा प्रतिक्रिया या निवडणूक रॅलीमधून नागरिकांकडून ऐकावयास मिळत होत्या. आम्हाला संदीप नाईकच पुन्हा आमदार हवेत, असे मत या रॅलीत सहभागी झालेल्या युवकांनी व्यक्त केले आहे.
प्रचारफेरीप्रसंगी श्री. नाईक नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की, नवी मुंबई शहरात अनेक जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. परंतु या शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करून खोटी ओशासने व अनेक प्रलोभने देत आहेत. परंतु नवी मुंबईची जनता ही कोणत्याच आमिषांना बळी न पडता आपल्यालाच निर्भयपणे मतदान करेल, असा आत्मविेशास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, वॉर्ड क्रमांक १२ मधील विरोधकांचे नगरसेवक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सुचविलेली नागरी कामे करीत नाहीत. उलट दमदाटी करतात. मी मात्र विकास कामे करताना कधीही दुजाभाव केला नाही. मतदारसंघाची प्रगती साधताना सर्वांना सोबत घेण्याचीच माझी आत्तापर्यंतची भूमिका राहिली असल्याचे नाईक म्हणाले. या प्रभागातील एका व्यक्तीच्या मृत्यूला याठिकाणी असणारे नगरसेवक व काही त्यांचेच साथीदार जबाबदार असून ‘त्या’ मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले. नवी मुंबईत काही राजकारणी मंडळी आपला राजकीय स्वार्थ साध्य करण्यासाठी दहशत निर्माण करीत आहेत. परंतु ही दहशत जनता कधी खपवून घेणार नाही. नवी मुंबई आध्यात्मिक व धार्मिक विचारांची नगरी असून या जनतेला दंडेलशाही नको आहे. तिला गरज आहे ती आध्यात्मिक विचारांची आणि विकासाची. म्हणून येत्या १५ तारखेला नवी मुंबईची जनता आपले मत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच देईल, ‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणून खोटी आश्वासने देणार्यांना जनता धुडकावून लावेल, असा विश्वास श्री. नाईक यांनी व्यक्त केला.
पालिकेचे सभागृह नेते अनंत सुतार, नगरसेवक एम. के. मढवी, समाजसेवक दिनेश पारख, संजय पाटील, वॉर्ड अध्यक्ष विकास शेळके, राजू सूर्यवंशी, अनिल नखाते, हिरामण राठोड, प्रकाश मंत्री, नगरसेविका विनया मढवी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने या निवडणूक प्रचार फेरीत सहभागी झाले होते.