नवी मुंबई : जात, पंथ,धर्म, प्रांत असा कोणताही भेदभाव न करता नवी मुंबईचा विकास केला आहे. नवी मुंबई हे माझे कुटुंब आहे, असे भावपूर्ण उदगार बेलापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंगे्रसचे उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांनी काढले आहेत. सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींचा विकास २.५ एफएसआयच्या माध्यमातून करण्यास शासनाची मान्यता मिळवली आहे असे सांगून जनतेला उल्लू बनविण्याचे धंदे विरोधकांनी सोडून द्यावेत, असा जबरदस्त हल्लाबोल लोकनेते नाईक यांनी विरोधकांवर केला आहे.
नेरुळच्या प्रभाग क्रमांक ७१, ७२. ७३ आणि इतर प्रभागांमध्ये लोकनेते नाईक यांनी गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी झंझावाती प्रचार केला. प्रचंड जनसमुदाय त्यांच्यासोबत होता. सर्वधर्मिय, प्रांतीय आणि सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. गणेश नाईकच आम्हाला पुन्हा आमदार हवेत, अशा गगनभेदी घोषणा दिल्या जात होत्या. ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करुन लोकनेते नाईक यांचे जल्लोषात स्वागत केले.
नवी मुंबईचा विकास करताना कोणताही दुजाभाव मनात ठेवला नाही. त्यामुळेच शहरातील सर्व घटकांचा मला संपूर्ण पाठींबा आहे. नवी मुंबईला मी माझे कुटुंब मानतो. या कुटुंबातील मोठा भाऊ म्हणजेच दादा म्हणून जनता मला मान देते. मी केलेल्या विकासकामांच्या जोरावरच मी चौथ्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत जिंकून जाईन, असा जबदरस्त आत्मविश्वास त्यांनी जनतेशी संवाद साधताना व्यक्त केला. ऐरोली मतदारसंघाचा समतोल विकास साधणारे राष्ट्रवादी कॉंगे्रसचे युवा उमेदवार संदीप नाईक हे देखील प्रचंड बहुमतांनी विजयी होतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. आमचा विजय हा नवी मुंबईकरांचा विजय असेल, असे मत त्यांनी मांडले.
आजवर कोणतीही विकासकामे न केल्याने विरोधक कोणत्या तोंडाने जनतेसमोर जाणार आहेत. त्यांच्याकडे मुददेच नसल्याने खोटी माहिती देवून ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. क्लस्टरच्या नावाखाली देखील या मंडळींनी राजकीय स्वार्थासाठी असाच खोटा दुष्प्रचार लोकसभा निवडणुकीत केला होता. मात्र जनता आता यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. जनतेला उल्लू बनविण्याचे दिवस गेले, असा घणाघात लोकनेते नाईक यांनी विरोधकांवर केला.
गाव आणि गावठाण क्षेत्रात प्रकल्पग्रस्तांनी आणि इतर सर्व घटकांनी गरजेपोटी केलेल्या बांधकामांना शासनाकडून संरक्षण मिळवून दिले आहे असे सांगून मी असताना या बांधकामांना आतापर्यंत धक्का पोहचू दिला नाही भविष्यातही देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली. शहरातील झोपडपटयांमधून लाखो गरीब आणि गरजू नागरिक राहतात.
या नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर इमारतीत मिळावे यासाठी शासनाकडून एसआरए योजना मान्य करुन घेतली आहे. झोपडयांना संरक्षण देवून त्यांचा विकास करणारच या वचनाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नी विरोधक जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप लोकनेते नाईक यांनी केला.
राष्ट्रवादी कॉगे्रसचे शहर कार्याध्यक्ष शशिकांत बिराजदार, नगरसेवक सुरेश शेट्टी, नगरसेविका नेत्रा शिर्के, नगरसेविका सुरेखा इथापे, माजी नगरसेवक रविंद्र इथापे, सीमा मोरे, रुचिता करपे, नंदा इंगोळकर, धरमसी पटेल, राजू गायकवाड, अजित दिक्षित, चंद्रकांत उबाळे, रिजवान शेख, शशिकांत गाडे, के.बी.कदम, भालचंद्र नलावडे, धरमप्रकाश वर्मा, शिवाजी पवार आदींसह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक या निवडणूक प्रचार फेरित सहभागी झाले होते.