सुजित शिंदे
नवी मुंबई : केवळ ठाणे जिल्ह्याचेच नाही तर उभ्या महाराष्ट्राचे लक्ष बेलापुर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागून राहीले आहे. ना. गणेश नाईकांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या मतदारसंघात कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसेसह प्रकल्पग्रस्त आघाडीनेदेखील मातब्बर उमेदवार उभे केल्याने नाईकांचे राजकीय अस्तित्व या निवडणूकीत पणाला लागले आहे.
बेलापुर मतदारसंघ हा एकेकाळी ना. गणेश नाईकांचाच बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखला जायचा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत बेलापुर विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजीव नाईकांना २५ हजारापेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर रहावे लागल्याने हा मतदारसंघ ना. नाईकांना ‘ऑल इज वेल’ राहीला नसल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. त्यातच शिवसेनेकडून उपनेते व नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राहीलेले आयएसआय अधिकारी विजय नाहटा, कॉंग्रेसकडून सिडको संचालक व प्रदेश सरचिटणिस नामदेव भगत, भाजपाकडून माजी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, मनसेकडून शहरअध्यक्ष गजानन काळे आणि प्रकल्पग्रस्त आघाडीकडून डॉ. राजेश पाटील असे स्थानिक भागातील रथी-महारथी स्वरूपातील प्रस्थापि निवडणूक रिंगणात उतरविल्याने ना. नाईकांना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागणार आहे.
बेलापुर विधानसभा मतदारसंघाची सुरूवात वाशी गाव आणि सानपाडा पामबीच परिसरापासून होेते. हा भाग राजकीयदृष्ट्या आजमितीला पूर्णपणे कॉंग्रेसच्या प्रभावाखाली असून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांची येथे निर्विवाद सत्ता आहे. सलग तीन वेळा ते या भागातून पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेलेले आहेत. वाशी गाव व सानपाडा पामबीच परिसरात दशरथ भगत यांचा घरटी जनसंपर्क असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागील दोन महापालिका निवडणूकीत जंग जंग पछाडूनही त्यांना दशरथ भगत यांना पराभूत करता आले नाही. उलटपक्षी त्यांना स्थानिक जनतेने दणदणीत मताधिक्क्याने विजयी केले आहे. कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार नामदेव भगत यांना वाशी गाव परिसर आणि सानपाडा पामबीच विभागातून अन्य पक्षाच्या तुलनेत दणदणीत आघाडीची अपेक्षा आहे.
वाशी गाव आणि सानपाडा-पामबीच परिसरातील लोकांचा राजकीय कल हा दशरथ भगत (नाना) बोले तशा स्वरूपाचा आहे. वाशी गावातील ग्रामस्थांमध्ये आणि सानपाडा पामबीच परिसरातील सुशिक्षितांमध्ये विशेषत: परप्रातिंयामध्ये दशरथ भगत यांनी चांगला समन्वय प्रस्थापित केल्याने आगामी दहा वर्षातही या परिसरातील दशरथ भगतांच्या राजकीय साम्राज्याला सुरूंग लावणे कोणालाही शक्य होणार आहे. ठाणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत यांचा वाशी गाव व सानपाडा-पामबीच परिसरावर प्रभाव असून दशरथ भगतांच्या मार्गदर्शनाखाली निशांत भगत यांनी युवकांचे संघठन या भागात केले आहे. या भागात परप्रातिंयामधून ऍड. रमेश त्रिपाठी हा सुशिक्षित चेहरा गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेस पक्षासाठी कार्यरत आहे.
मागील काही वर्षापासून कॉंग्रेस पक्षांतर्गत असलेली गटबाजी व राजकीय सुंदोपसुंदी लक्षात घेता दशरथ भगत हे नामदेव भगतांसाठी सक्रिय होणार नाहीत आणि काम करणार नाहीत अशी अटकळ बांधली जात होती. तथापि या समजाला व सुटणार्या अफवांना छेद देत दशरथ भगत यांनी वाशी गाव व सानपाडा पामबीच परिसरात जोरदारपणे कॉंग्रेसचे काम सुरू केले आहे. कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला छेद देण्यासाठी दशरथ भगत विरोधकांना मॅनेज झाले असल्याच्या अफवाही गेल्या आठवड्यात सोडण्यात आल्या. तथापि कॉंग्रेसचे उमेदवार नामदेव भगत यांनाच समवेत घेवून दशरथ भगत यांनी प्रचार रॅली व संपर्क अभियान वाशी गावासह सानपाडा पामबीच परिसरात राबविल्याने अफवा हवेतच विरल्या गेल्या.
पालिका स्तरावरील राजकारण पाहता कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत आणि राष्ट्रवादी कॉंग्र्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. सानपाडा पामबीच भागात मोराज समोरील भुखंडावरील उद्यानाच्या बाबतीत घडलेला प्रकार आजही दशरथ भगत विसरलेले नाहीत. पालिकेतील भ्रष्टाचारावर तोफ डागत दशरथ भगत यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सत्ताधार्यांच्या विरोधात दशरथ भगत यांनी महापालिकेवर मोर्चाही काढला होता. नेरूळ रूग्णालयातील ओपीडी उद्घाटनाच्यावेळीही दशरथ भगतांनी निदर्शने केली होती. वाशी गाव आणि सानपाडा पामबीच परिसरातून कॉंग्रेसच्या नामदेव भगतांनी दणदणीत आघाडी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रचारादरम्यान प्राप्त झाल्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून या भागावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांना अथवा पदाधिकार्यांना कॉंग्रेस विरोधकांनी संपर्क साधल्यावर स्थानिकांकडून ‘नानांनी पाच वर्षात आमची कामे केली आहे, नानाचा संपर्क आहे, नानाच्या विरोधात आम्हाला जायचे नाही’ अशा प्रतिक्रिया त्यांना अनुभवयास आल्या आहेत.
बेलापुर विधानसभेच्या वाशीगाव-सानपाडा पामबीच परिसरात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्या राजकीय प्रभावामुळे दणदणीत आघाडी मिळण्याची शक्यता असली तरी सानपाडा, जुईनगर, नेरूळ, तुर्भे, शिरवणे, करावे, दारावे, सिवूड्स, बेलापुर आदी भागात कॉंग्रेसचा स्थानिक ग्रामस्थांवर आणि परप्रातिंय मतदारांवर कितपत प्रभाव पडतो यावर नामदेव भगत यांच्या विजयाची समीकरणे अवलंबून असणार आहेत.