सुजित शिंदे
नवी मुंबई : उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या बेलापुर मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. नवी मुंबईचे महापौर सागर नाईकांसह माजी खासदार संजीव नाईक हे बेलापुर मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढत आहेत. गणेश नाईक स्वत: प्रभागाप्रभागांना भेटी देत आहे. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी गणेश नाईक हे शिरवणे व जुईनगरमधील मतदारांशी संपर्क साधणार आहेत.
शिरवणे हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयवंत सुतारांचा बालेकिल्ला समजला जात असला तरी प्रकल्पग्रस्त आघाडीकडून शिरवणे गावचेच ग्रामस्थ डॉ. राजेश पाटील निवडणूक रिंगणात उतरल्याने शिरवणेकरांचा कल डॉ. पाटील यांच्याकडेच असण्याची दाट शक्यता आहे. शिरवणे व जुईनगरातून जयवंत सुतार राष्ट्रवादीसाठी किती मतदान खेचतात यावर त्यांचा स्थानिक भागातील जनाधार स्पष्ट होणार आहे. जुईनगरमध्ये शिवसेनेचा प्रभाव अधिक असून नरेश चाळके यांचे संघठन कौशल्य चांगले आहे. शिवसेनेच्या महिला शहर संघठक रोहीणी भोईर यांचेही या भागात कार्य आहे. जुईनगरमध्ये वास्तव्यास आलेला मतदार हा मुंबई व मुंबई उपनगरातून आलेला असल्याने त्यांच्यावर शिवसेनेचा पूर्वीपासूनच प्रभाव पहावयास मिळत आहे. जुईनगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष विजय साळे कार्यरत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळणार्या मतांवर स्थानिक भागातील त्यांची लोकप्रियता स्पष्ट होणार आहे.
रविवारी शिरवणे व जुईनगर भागात गणेश नाईकांच्या प्रचारासाठी चौकसभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १० वाजता शिरवणे-जुईनगरमधील चिंचोली तलावापासून रॅली काढण्यात येणार असून दुपारी १२ वाजेपर्यत ही रॅली चालणार आहे. जुईनगर -शिरवणे भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी मिळणार्या मतदानावर जयवंत सुतार, स्थानिक नगरसेविका माधुरी सुतार, वॉर्ड अध्यक्ष विजय साळे यांच्या पाठीशी किती जनाधार आहे ते स्पष्ट होणार आहे. शिरवणेत प्रकल्पग्रस्त आघाडीच्या डॉ. राजेश पाटील यांना जनाधार वाढत असून जुईनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनत चालला आहे.